कोरोना काळात आपल्या आरोग्याची पर्वा न करता इतरांच्या आरोग्याची काळजी घेणा-या स्वच्छता कामगारांना तीन महिने वेतन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्यापुढे चूल कशी पेटवायची, असा प्रश्न आहे.
कामगारांचे आंदोलन
हक्काचे वेतन मिळावे, यासाठी झाडणकाम करणाऱ्या कामगारांनी धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात धरणे आंदोलन केले. धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाने कोविड काळात कलम ६७ (३) क अंतर्गत झाडणकामाचे कंत्राट एका ठेकेदाराला दिले.
या ठेकेदाराकडे कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचेदेखील काम आहे. फेब्रुवारीपासून झालेल्या कामाचे पैसे कामगारांना मिळालेले नव्हते. दरम्यान, यातील दोन महिन्यांचे वेतन कामगारांना देण्यात आले; परंतु अद्याप तीन महिन्यांचे वेतन मिळालेले नाही.
पालिकेकडून बील थकीत
ठेकेदाराला विनानिविदा काम देण्यात आले होते. त्यामुळे पालिकेकडून ठेकेदाराला अद्याप बिल अदा करण्यात आलेले नाही. हे प्रकरण आयुक्तांच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आलेले आहे. ती मान्यता मिळताच ठेकेदाराची बिले अदा केली जाणार असल्याचे क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, या ठेकेदाराला एक जून रोजी कार्यादेश देण्यात आलेले आहेत. कामगारांना येत्या सोमवारी वेतन देण्याचे आश्वासन ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.