मुंबई :-  खासदार संजय राऊत हे कायम वेगवेगळ्या विषयांनी चर्चेत असतात. त्यांची विधाने कायम वादाला निमंत्रण देत असतात. आताही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर राष्ट्रीय ब्रँड असतील, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मोदीनंतर राष्ट्रीय ब्रँड असल्याचं सांगत त्यांच्यात देशाचं नेतृत्व करण्याची धमक असल्याचं सांगितल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ठाकरेंसारख्या संयमी नेत्याची गरज

“महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय स्तरावर स्वीकारण्यात आलं आहे. मोदींनंतर देशाला नेतृत्व देणारं कोण? असा विचार लोकांना पडतो. आज देशाच्या राष्ट्रीय पक्षाला मोठं आव्हान निर्माण करतील, अशी ताकद ‘ठाकरे ब्रँड’मध्ये आहे.

देशाला संयमी आणि शांत स्वभावाच्या नेत्याची गरज

देश आज ज्या संकाटातून जात आहे, ते पाहता देशाला आज संयमी आणि शांत स्वभावाच्या नेत्याची गरज आहे. मोदी मोठे नेते आहेतच; पण त्यांच्यानंतर कुणी नाही असं होत नाही,” अशी टीका राऊत यांनी केली.

Advertisement

उद्धव ठाकरे नक्कीच देशाला नेतृत्व देऊ शकतील

ठाकरे आज राज्यात कोणतीही आदळआपट न करता शांतपणे उत्तम काम करताहेत. ते मुख्यमंत्री होतील असं कुणाला वाटलं नव्हतं; पण आज ते ज्या पद्धतीनं काम करतायत, ते संपूर्ण देश पाहतोय. त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे नक्कीच देशाला नेतृत्व देऊ शकतील”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नेहरु-इंदिरांच्या काळातही ताकदीचे नेते होते

“भारत देश हा काही लहान देश नाही. खंडप्राय देश आहे. त्यामुळे केवळ एक नव्हे, अनेक ताकदीचे नेते सोबत असतात. नेहरू आणि इंदिरांच्या काळतही तितकेच ताकदीचे १० नेते होते. त्यामुळे नवं नेतृत्व हे नेहमीच देशाला लाभत असतं. मोदी तर आहेतच; पण देशात आज उद्धव ठाकरेसुद्धा ताकदीचं नेतृत्व आहे”, असे राऊत म्हणाले.

स्वबळाबाबत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी काहीच सांगितलं नाही

राज्यात काँग्रेस पक्षानं स्वबळाचा नारा दिला आहे. याबाबत विचारण्यात आलं असता राऊत यांनी केंद्रीय नेतृत्वातून अद्याप तसं काही आम्हाला सांगण्यात आलेलं नाही, असं म्हणत काँग्रेसच्या स्वबळाची हवाच काढून टाकली.

Advertisement