गेल्या महिन्याभरात पावसानं दडी मारल्यानं पुणेकरांच्या तोंडचं पाणी पळाले होते. पिण्याच्या पाण्याची चिंता लागली होती.
पुण्यात अजूनही समाधानकारक पाऊस नसला, तरी धरण क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्याने साठ्यांत समाधानकारक वाढ झाली आहे.
दोन टीएमसीने साठ्यात वाढ
पुण्याच्या खडकवासला धरण साखळीत या वर्षी हंगामातील सर्वाधिक पाऊस पडला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे चारही धरणांमधील पाणीसाठ्यात दोन टीएमसीने वाढ झाली आहे.
धरण साखळीतील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणात मिळून सध्या 11.3 टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी आजच्याच दिवशी धरणात 9.47 टीएमसी पाणीसाठा होता.
पवनाच्या पाणलोटातही पाऊस
पिंपरी-चिंचवड महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रातही दमदार पाऊस झाला आहे. गेल्या 24 तासात याठिकाणी 60 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
1 जूनपासून या परिसरात तब्बल 798 मिमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात पवना धरणक्षेत्रात 484 मिमी पाऊस झाला होता.
सध्या पवना धरणांत 40.44 टक्के पाणी आहे. गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात 2.59 टक्के तर एक जूनपासून पाणीसाठ्यात 8.85 टक्के इतकी वाढ झाली आहे.
मुंबईतील तलावक्षेत्रातही मुसळधार पाऊस
डोक्यावर पाणीकपातीची टांगती तलवार असलेल्या मुंबईकरांनाही नुकत्याच झालेल्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या 24 तासांमध्ये मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा एक लाख 28 हजार दशलक्ष लिटरने वाढला आहे.