पुणे महापालिका हद्दीत समावेश करण्यात आलेल्या 23 गावातील शाळा, जमिनी, अंगणवाड्या या सर्व जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व विभागांना मंजुरी दिल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

बैठक राजकीय नव्हे, शासकीय

पवार यांच्या उपस्थितीत याबाबतची बैठक पार पडली. या बैठकीला पुण्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. महापौरांनीही या बैठकीला उपस्थित राहायला हवं होतं. त्यांना व्यक्तिगत निमंत्रण देण्यात आलं होतं, की नाही याबाबत आपल्याला माहिती नसल्याचं सत्तार म्हणाले.

नगरविकास, महसूल, ग्रामविकास या सर्व विभागांना एकत्र आणून या गावांबाबत निर्णय घेण्यात आला. महापालिका कशी सक्षम होईल त्या दृष्टिकोनातून ही बैठक होती. ही कुठलीही राजकीय बैठक नव्हती, तर शासकीय बैठक होती.

Advertisement

पुणे महापालिकेच्या हद्दवाढीतील सर्व शाळा, पाणीपुरवठा योजना, स्मशानभूमी यांचा महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

अजित पवारांचे प्रशासनाला निर्देश

पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट भागाच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. या भागाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय व सहकार्याने काम करावं, असे निर्देश अजित पवार यांनी आज दिले.

हद्दवाढीतील गावांबाबत कोणते महत्वाचे निर्णय ?

पुणे महापालिका हद्दीतील म्हाडाच्या जुन्या मोडकळीला आलेल्या इमारतींच्या पुनर्वसनाची कामे तातडीने मार्गी लावण्याच्या, तसंच हद्दीत समाविष्ट गावांमधील शाळा, अंगणवाड्या पुणे महापालिकेला हस्तांतरीत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्या.

Advertisement

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या शिवणे, उत्तमनगर, कोंढवे-धावडे पाणीयोजनांचे हस्तांतर तसेच पुणे महानगरपालिका विकास आराखड्यातील बालग्राम प्रमाणेच अग्रसेन शाळेची जागा महापालिकेला हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव पाठविण्याची सूचनाही पवार यांनी बैठकीत केली.

पुणे शहराच्या जलद व सर्वसमावेशक विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी बैठकीत केला.

Advertisement