पिंपरी :- कंपनीच्या सुरक्षा रक्षकास डांबून मारहाण तसेच चाकूचा धाक दाखवून कंपनीतील लाखांचा ऐवज लुटणाऱ्या चौघांना म्हाळुंगे पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान यातील मुख्य सूत्रधार असणाऱ्या भंगार माफियाला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने धुळे येथून अटक केली.

रशिद छोटुमियॉं शेख (वय ५२, रा. खंडोबा माळ, चाकण, ता.खेड जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रशिद हा भांगर माफिया असून पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर पुणे ग्रामीण, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी चोरी, घरफोडी, फसवणूक, चोरीचा माल घेणे, मारामारीचे असे १० गुन्हे दाखल आहेत.

आरोपींनी २३ मे रोजी सावरदरी येथील तौरॉल इंडीया कंपनीच्या सुरक्षा रक्षकास डांबून ठेवत चाकूचा धाक दाखवून हाताने माराहाण केली. तसेच कंपनीतील ॲल्युमिनिअम उत्पादनाकरीता लागणारे एक लाखांचे चिल्सचे सुट्टे भाग लुटून नेले.

याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. मात्र या टोळीचा म्होरक्‍या रशिद शेख हा पोलिसांना गुंगारा देत होता.
खंडणी विरोधी पथकातील पोलिस उपनिरीक्षक महेंद्र पाटील व पोलिस हवालदार सुनिल कानगुडे यांना त्यांच्या बातमीदारा मार्फत आरोपी रशिद याच्याबाबत माहिती मिळाली.

त्यानुसार धुळे-जळगाव रस्त्यावर गौरव हॉटेल समोरून आरोपी रशिद याला पोलिसांनी ताब्यात घेतले.त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला पुढील तपासासाठी म्हाळुंगे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.