राज्यात वेगळी राजकीय समीकरणे आकाराला येण्याची शक्यता व्यक्त होत असताना आता गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिवसेना-राष्ट्रवादीत दुरावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आव्हाड हे अतिशय विश्वासू सहकारी आहेत. पवार यांच्या हस्ते टाटा हाॅस्पिटलला म्हाडाच्या शंभर सदनिकांच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम झाला असताना या सदनिका देण्यास मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने दोन्ही पक्षांत कमालीचा दुरावा निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात तब्बल दोन ते अडीच तास गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे.

Advertisement

भेटीवरून तर्कवितर्क

दोन दिवसांपूर्वी ही भेट झाल्याचे सूत्रांकडून समजते. पोलिसांच्या घरांबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक झाल्याचं सांगण्यात येत आहे. फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी आव्हाड यांना बीडीडी चाळीतील पोलिसांच्या घरासंदर्भात पत्र लिहिलं होतं.

त्यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतं. मात्र, सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता राजकीय वर्तुळात या भेटीवरूनही तर्कवितर्क लढवले जात आहेत.

वेगळी राजकीय खेळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात दिल्लीत झालेल्या भेटीपासून शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement

प्रताप सरनाईक यांच्या भाजपशी जुळवून घेण्याच्या मागणीमुळं यात भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस काही वेगळीच खेळी करतेय की काय, असाही अंदाज बांधला जात आहे.

विनाअट पाठिब्यांचा इतिहास

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शरद पवारांच्या पुढाकारानं राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं असलं तरी त्यापूर्वी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला विनाअट पाठिंबा देऊ केला होता, हा इतिहासही नाकारता येत नाही. फडणवीस आणि आव्हाड यांची भेट यामुळंच महत्त्वाची मानली जात आहे.

Advertisement