आषाढी वारीच्या सोहळ्यात गोल आणि उभे रिंगण हे दोन सोहळे अतिशय महत्वाचे असतात. गेल्या वर्षापासून कोरोनामुळे पायी वारी होत नसली, तरी पालखीतील अन्य सोहळे प्रतिकात्मक पद्धतीने होत असतात. असेच पहिले रिंगण देहूत झाले.
अश्वासह पार पडले पहिले रिंगण
श्री संत तुकाराम महाराजांच्या 336 व्या पायीवारी पालखी सोहळ्यातील वाटचालीतील अश्वासह पहिले गोल रिंगण जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात श्री क्षेत्र देहूगाव येथे पार पडले.
हे रिंगण पाहण्यासाठी उपस्थित असलेल्य वारकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. पहाटे चार वाजता श्री विठ्ठल रुक्मिनी मंदिरात काकडाआरती झाली. सकाळी अकरा वाजता मंदिरातील भजनी मंडळात भजनाला सुरुवात झाली.
त्यानंतर पालखी मंदिराच्या आवारात प्रदक्षिणेसाठी बाहेर घेण्यात आली. या वेळी तुतारी वाजताच उपस्थित सेवेकऱ्यांनी गरुड टक्के, अब्दागिरी, पताका व जरी पटका घेत आप आपल्या सेवेला सुरुवात केली. त्यानंतर पालखी खांद्यावर घेत मंदिराच्या आवारात आणली.
भजन करीत खेळली पावले
दरम्यानच्या काळात चोपदार यांच्या वारीतील दंडाचा इशारा झाला आणि उपस्थितांनी भजन करीत पावले खेळण्यास सुरुवात केली.
दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास पावले खेळण्याचे झाल्यानंतर वारीतील वाटचालीप्रमाणे उपस्थित वारकऱ्यांनी गोल रिंगण केले.
मधोमध पालखी ठेवण्यात आली. तेथे काही काळ भजन करीत पावले फुगड्यांचाही डाव रंगात आलेला असताना खेळ खेळत गोल रिंगणाला सुरुवात झाली.
रिंगणात धाव
सर्व उपस्थित वीणेकरी, पखवाज वादक, वारकरी संप्रदयाची भगवी पताका खांद्यावर घेऊन वारकरी, डोक्यावर तुळस घेऊन वारकरी भगिनी मंदिराच्या आवारात रिंगणात धाव घेतली. त्यानंतर रिंगणात पाढरा शुभ्र अश्व रिंगणात आणला.
घोडेस्वाराच्या खांद्यावर भगवी पताका घेऊन अश्व रिंगणात सोडण्यात आला. या वेळी वारकऱ्यांनी ज्ञानोबा तुकाराम नामाचा गजर करीत आनंद व्यक्त केला.