ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची आता स्वकीयांविरोधात जंग !

भ्रष्टाचाराविरोधात रान उठविणा-या ज्येष्ठ समासेवक अण्णा हजारे यांनी स्थापन केलेल्या पारनेर सैनिक सहकारी बँकेतील गैरव्यवहाराच्या तक्रारीची सहकार आणि पोलिस खाते तपास लावीत असल्याने आता या बँकेतील गैरकारभाराविरोधात हजारे यांनाच शस्त्र हाती घ्यावे लागले. त्याची दखल सहकार खात्याने घेतली असून चाैकशी केली आहे.

दशकभरापासून गैरव्यवहाराची चर्चा

राज्य व केंद्र सररकारमधील तसेच विविध संस्थांमधील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन करणा-या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना आता त्यांनीच स्थापन केलेल्या संस्थेविरोधात मैदानात उतरण्याची वेळ आली आहे. पारनेर सैनिक सहकारी बँकेतील गैरव्यवहार गेल्या दहा वर्षांपासून गाजत असताना आणि या प्रकरणात अनेक गुन्हे दाखल झाले असताना आता हजारे यांनी आवाज उठविला आहे.

बँकेच्या अधिकारी,पदाधिका-यांना लागली भ्रष्टाचाराची गोडी

लष्कारातून निवृत्त झालेल्या सैनिकांनी एकत्र येऊन पारनेर सैनिक सहकारी बँकेची स्थापना केली. हजारेही लष्करात होते. या बँकेच्या स्थापनेत त्यांचाही मोठा वाटा होता. त्यांच्यावर विश्वास ठेवून अनेकांनी ठेवी ठेवल्या. गुंतवणूक केली. बँकेचा सुरुवातीला काही काळ लाैकिक होता.

पहिल्या पाच वर्षानंतर हजारे यांनीही अंग काढून घेतले. त्यानंतर या बँकेच्या पदाधिकारी, अधिका-यांना भ्रष्टाचाराची कीड लागली. जो सामाजिक नेता देश व राज्याला हादरवून टाकतो, धावायला लावतो, त्याच नेत्याने स्थापन केलेल्या बँकेत गैरव्यवहार करावा, याची जराही भीती अधिकारी, पदाधिका-यांना वाटली नाही.

फाईली पाहून हजारेंना गैरव्यवहाराची पटली खात्री

पारनेर सैनिक सहकारी बँकेतील गैरव्यवहारांबद्दल हजारे यांनी तक्रार केली होती. त्याची दखल आता सहकार विभागाने घेतली असून चौकशी केली आहे. बँकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे गेली पाच वर्षे विनायक गोस्वामी, बाळासाहेब नरसाळे, कॅप्टन विठ्ठल वराळ, मारुती पोटघन, संपत शिरसाठ व विद्यमान संचालक सुदाम कोथिंबीरे यांनी सहकार विभागाकडे देऊन तपासणी व्हावी, अशी मागणीही केली होती;

मात्र सहकार विभाग ठोस निर्णय घेत नव्हता. शेवटी या तक्रारदारानीं त्या फाईल्स हजारे यांच्याकडे दिल्या. हजारे यांनी त्याचा अभ्यास करून खात्री केली. खात्री झाल्यावर सहकार आयुक्तांना पत्र पाठवून सैनिक बँकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली. त्याची दखल घेत या तक्रार अर्जाची स्वतंत्र चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी विभागीय सहनिबंधक आर.सी. शाह यांना दिले.