अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे काही दिवसांसाठी एकांतवासात जाणार आहेत. त्याबाबतची पोस्ट त्यांनी फेसबुकवर केली असून त्यामुळे खळबळ उडाली आहे.

शिरूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करून लोकसभेत पोहोतलेले खासदार डॉ. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक आहेत.

विधानसभा निवडणुकीत अमोल मिटकरी आणि अमोल कोल्हे यांनी प्रचाराची जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर कोल्हे हे राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते होते.

Advertisement

काही काळ आपला कुणाशीही संपर्क होणार नसल्याची फेसबुक पोस्ट अमोल कोल्हे यांनी केलीय. शारीरिक आणि मानसिक थकव्यामुळं आपण हा निर्णय घेत असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय.

काही निर्णयांचा विचार करण्यासाठी आणि कदाचित फेरविचार करण्यासाठी आपल्याला एकांत हवा असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय.

त्यामुळं कोल्हे कुठल्या निर्णयाचा फेरविचार करणार याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.

Advertisement

डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून ही माहिती दिली आहे. त्यांची फेसबुक पोस्ट नेमकी काय आहे ते त्यांच्याच शब्दात पाहू,

“सिंहावलोकनाची वेळ:- गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले, अनपेक्षित पावलं उचलली. पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय..थोडा शारीरिक, बराचसा मानसिक! शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन!
घेतलेल्या निर्णयांचा विचार, आणि कदाचित फेरविचार सुद्धा!
त्यासाठीच एकांतवासात जातोय.. काही काळ संपर्क होणार नाही! पुन्हा लवकरच भेटू…नव्या जोमाने, नव्या जोशाने!!
टीप:- फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही😜”

दरम्यान, गेल्या काही काळात ग्रामीण भागात अमोल कोल्हे यांचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. अनेक ऐतिहासिक भूमिका साकारल्यामुळे नागरिक त्यांच्याकडे कायम आदराने पाहतात.

Advertisement

याच इमेजचा फायदा उठवत अमोल कोल्हे यांनी मोदीलाटेतही लोकसभेची निवडणूक जिंकली.२०१९ मध्ये महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ चार खासदार निवडून आले.

यामध्ये अमोल कोल्हे यांचादेखील समावेश आहे. आताही कोल्हे एखाद्या मुद्द्यावर बोलतात तेव्हा ग्रामीण भागात त्याची बऱ्यापैकी चर्चा रंगते.

Advertisement