परदेशात नोकरी लावण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची फसवणूक करण्याच्या प्रकरणी अनुप पंढरीनाथ ढोरमले (वय ३०, रा. जातेगाव, जि. नगर) या मुख्य सूत्रधाराला सायबर क्राईम विभागाच्या पोलिसांनी शुक्रवारी (दि. २८) बेड्या ठोकल्या.

गुजरात पोलिसांनी त्याला या स्वरुपाच्याच गुन्ह्यात कारागृहात ठेवले होते. तेथून तपासासाठी पोलिसांनी त्याला पुण्यात आणले आहे. ढोरमले याचा साथीदार विशाल मीनानाथ जमदाडे (वय २४, रा. पारनेर, जि नगर) याला पोलसांनी गेल्या महिन्यात अटक केली होती.

या दोघांनी फसवणूक केल्याच्या दोन फिर्यादी दाखल आहेत. त्यांनी राज्याच्या निरनिराळ्या भागांबरोबरच परराज्यातील युवकांचीही मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचे प्राथमिक पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. तपासासाठी त्याला येत्या एक जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

Advertisement

ढोरमले याने खासगी नोकरीविषयक केंद्र सुरू केले होते. त्या माध्यमातून विविध देशांमध्ये नोकरी लावण्यासाठी त्याने आकर्षक वेबसाईट तयार केली होती. त्या माध्यमातून तो विदेशांमध्ये नोकरीसाठी जाण्यास उत्सुक असलेल्या तरुणांची माहिती तो संकलित करून त्यांच्याशी संपर्क साधत असे.

त्याच्या मिठ्ठास वाणीला भुलून आणि कार्यपद्धतीला फसून अनेकजण त्याच्याकडे नावांची नोंदणी करत असत. त्यांच्याकडून ऑनलाइन मुलाखत, व्हिसा, वैद्यकीय चाचणी शुल्क व तत्सम बहाण्याने तो दीड ते पाच लाख रुपये उकळत असे. रक्कम ताब्यात आल्यावर तो त्यांचे संपर्क बंद करीत असे.

गेल्या वर्षभरात त्याने या पद्धतीने अनेकांची फसवणूक केली. त्यापैकी दोघांनी नुकतीच पोलिसांकडे फिर्याद नोंदवली. या गुन्ह्याचा माग काढून आर्थिक व सायबर गुन्हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित, पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, हवालदार संदेश कर्णे, अस्लम अत्तार, मंगेश नेवसे व त्यांच्या पथकाने संशयित आरोपी जमदाडे याला पारनेर (जि. नगर)मध्ये सापळा रचून अटक केली.

Advertisement

मुख्य सूत्रधार ढोरमले याच्यासाठी तो पैसे स्वीकारण्याचे काम करीत होता. त्याच्याकडून गुन्ह्याच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती घेण्यात आली. सूत्रधार ढोरमले याला याच स्वरूपाच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात दोन महिन्यापूर्वी गुजरात पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस कोठडीची मुदत संपल्याने तो सध्या वडोदरा येथील कारागृहात असल्याची माहिती तपासात पुढे आली. त्यानुसार न्यायालयातून वॉरंट घेऊन पोलिसांचे पथक गुजरातला रवाना झाले होते. दरम्यान, परदेशात नोकरी लावण्याचे स्वप्न दाखवून सत्तर युवकांची पन्नास लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी विमाननगर परिसरातही उघडकीस आला.

संशयित आरोपी रक्षित गौतमभाई पटेल (रा. बडोदा) आणि रूबीकुमारी सुशीलकुमार पोद्दार (रा. विमाननगर) फरारी आहेत. परदेशात नोकरी लावण्याचे स्वप्न दाखवून विमाननगर परिसरातील एका एजन्सीच्या माध्यमातून सत्तर युवकांची पन्नास लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.

Advertisement