कोरोना आणि आता सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेमुळे रक्तदानात अडथळा निर्माण झाला आहे. गर्दीचे निर्बंध, महाविद्यालये बंद, स्वंयसेवी संस्था अन्य कामांत गुंतलेल्या आदी कारणांमुळं मुंबईसह महाराष्ट्रात रक्ताची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

शस्त्रक्रियांमुळे मागणी वाढली

ज्या लोकांना लस दिली जाते, ते 14 दिवसांपर्यंत रक्तदान करू शकत नाहीत. साठवणूक करण्यात ही मोठी अडचण ठरली आहे. मुंबईत आता रक्ताचा तीव्र तुटवडा भासू लागला आहे.

मुंबईत सुरू असलेले लसीकरण आणि वाढलेल्या शस्त्रक्रियांमुळे मुंबईत तीव्र रक्त तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेचे प्रभारी डॉ. अरुण थोरात यांनी ही माहिती दिली.

Advertisement

रक्तसाठा निम्म्यावर

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या फक्त 22 हजार युनिट रक्तसाठा आहे. तोच आधी या कालावधीत 40 ते 50 हजारांहून अधिक युनिट रक्तसाठा असायचा.

म्हणजेच, जवळपास अर्ध्यावर रक्तसाठा आला आहे. मुंबईत फक्त 3,200 युनिट एवढाच रक्तसाठा आहे. जो साधारणपणे पाच हजारांपर्यंत असतो, असे त्यांनी सांगितले.

रक्तदाते वाढेनात

महाराष्ट्रात सरासरी दिवसाला चार लाख 29 हजार जणांचे लसीकरण केले जाते. जेजे रुग्णालयाचे प्रभारी डॉ. हितेश पगारे म्हणाले, की रूटीन शस्त्रक्रिया वाढल्यानेही रक्ताची मागणी वाढली आहे.

Advertisement

आता शहर टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे, म्हणून रूग्णालयांनी नियमित कामकाज सुरू केले आहे. रक्ताची मागणी वाढली आहे; पण दान वाढलेले नाही.

थॅलेसीमियाच्या रुग्णांना फटका

जे.जे रुग्णालयात दरमहा 2500 युनिट रक्त लागते; पण आता 1500 युनिट एवढे रक्त मिळत आहे. थॅलेसीमियाच्या रुग्णांना या कमतरतेचा सर्वाधिक फटका बसला आहे.

थॅलेसीमियाच्या रुग्णांना आठवड्यातून दोनदा रक्त बदलावे लागते; पण त्यांनाही रक्त तुटवड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

Advertisement