अमेरिकेत अधिकारी असल्याचे सांगून महिलेवर लैंगिक अत्याचार करून, तिला लुटल्याचा गुन्हा ताजा असताना भारतीय गुप्तचर खात्याचा अधिकारी असल्याचे सांगून तरुणीला नग्न व्हिडिओ करण्यास भाग पाडण्यात आले. तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध करणा-याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

हा आहे ‘राॅ’ चा बनावट अधिकारी

‘रॉ’ या संस्थेचे बनावट ओळखपत्र तयार करून उच्चपदावर काम केल्याचे भासवत तिच्या कुटुंबाला वारंवार ईमेल, मेसेज आणि कॉल करून छळवणूक करणाऱ्या आरोपीला उत्तमनगर पोलिसांनी अटक केली.

न्यायाधीश जान्हवी केळकर यांनी त्याला 22 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. नितेश उर्फ निकेश प्रकाश राठोड ( वय 29 रा. मूळगाव हावनूर लमाण तांडा ता. अफजलपूर, जि.गुलबर्गा, सध्या रा: महादेवनगर हिंगणे, सिहंगड रस्ता) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ही घटना 2018 ते 14 जुलै 2021 दरम्यान फिर्यादी तरुणीच्या राहात्या घरी आणि कात्रजच्या आरंभ लॉजमध्ये घडली.

Advertisement

घरच्यांना मारून टाकण्याची धमकी

आरोपीने स्वत: अनाथ असल्याचे सांगून भावनिक करून, घरच्यांना मारून टाकण्याची धमकी देत तिला स्वत:चे दोन नग्न व्हिडिओ करायला भाग पाडले.

आरोपीने वारंवार मानसिक त्रास दिल्यामुळे तरुणीने एक्सपायर झालेल्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. नग्न व्हिडिओ सोशल मीडिया व वेबसाईटवर टाकण्याची धमकी देत इच्छेविरूद्ध शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.

आरोपीने फिर्यादीच्या परवानगीशिवाय तिचा मोबाईल अँक्सेस घेतला. अखेर तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली.

Advertisement

आणखी महिलांच्या फसवणुकीचा तपास करणार

आरोपीने वेगवेगळे ईमेल आयडी कुठे आणि कोणत्या नावाने तयार केले आणि कुठल्या कुठल्या गुन्हयात वापरले आहेत याबाबत तपास करणे आवश्यक आहे.

आरोपीने फिर्यादीच्या मोबाईलमध्ये एक विशिष्ट प्रकारचे अॅप डाऊनलोड करून मोबाईलचा अँक्सेस स्वत: वापरला आहे. त्याने फिर्यादीच्या मोबाईलमधून काय काय फोटो आणि व मेसेज व्हिडिओ ईमेलने पाठविले आहेत याचा सखोल तपास करायचा आहे.

आरोपीने या गुन्हयात वापरलेली मोडस इतर ठिकाणी वापरून इतर महिला किंवा मुलीचा वापर केला आहे का? गुन्हयामागचा उद्देश काय आहे, हे जाणून घ्यायचे आहे.

Advertisement

त्याने सीआरपीएफ तसेच ‘रॉ’ या महत्वपूर्ण सैन्यदलाच्या विभागात उच्चपदावर काम केल्याचे ओळखपत्र दाखविले आहे. त्या ओळखपत्राचा तपास करणे आवश्यक आहे.

त्यामुळे सरकारी वकील किरण बेंडभर यांनी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. ती न्यायालयाने मान्य केली.

Advertisement