‘उद्धव साहेब तुम्ही हकालपट्टी केली नाही, मी माझ्या मनातून तुम्हाला काढले आहे,’ अशी प्रतिक्रिया शिवसेनेतून हकालपट्टी झालेले नेते रामदास कदम यांनी मंगळवारी (ता.१९) दिली. शिवसेनेतील बंडाच्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी त्यांच्या मनातील खदखद आज बोलून दाखवली.

ते ढसाढसा रडलेही. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर शिवसेना फोडल्याचा आरोप त्यांनी खेड (जि. रत्नागिरी) येथून दूरचित्रवाहिनीशी बोलताना केला.

रामदास कदम यांनी हकालपट्टीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ज्यांच्यासाठी एवढे केले, त्यांनीच हकालपट्टी केली.

उद्धव साहेब आणखी किती जणांची हकालपट्टी करणार आहात. ५१ आमदारांची हकालपट्टी केली. उद्या १२ खासदार जातील. त्यांची हकालपट्टी कराल.

शेकडो नगरसेवकांची हकालपट्टी केली. आता मातोश्रीवर बसून तुम्हाला केवळ हकालपट्टी करणे एवढेच काम राहिले आहे का?, असे कदम म्हणाले.

हे स्वयंकेंद्रित लोक : अरविंद सावंत यांची टीका

‘ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तेव्हापासून ते आतापर्यंत रामदास कदम यांनी एक अवाक्षरही काढले नाही. अडीच वर्षांत त्यांनी मातोश्रीवर पाय ठेवला नाही.

मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी अभिनंदनही केले नाही. ही स्वयंकेंद्रित लोक असून, मोठ्या मनाची नव्हती आणि आजही नाहीत,’ अशी टीका सेनेचे मुख्य प्रवक्ते अरविंद सावंत यांनी कदम यांच्यावर केली.