मुंबई – दसरा मेळाव्याची लढाई संपल्यानंतर आता शिवसेनेच्या (Shiv Sena) ठाकरे आणि शिंदे गटातली (Shinde Group) पुढची लढाई सुरु झाली असून, ही लढाई शिवसेना पक्षाच्या चिन्हाबाबत असणार आहे. शिवसेनेत (Shivsena) अभूतपूर्व फूट पडली असून, यामध्ये आता दोन वेगळे गट पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील गटाने आपला गटच शिवसेना असल्याचा दावा केला आहे.

तर दुसऱ्या बाजूला पक्षात झालेल्या मोठ्या बंडखोरीनंतर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अनेक प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, शिवसेनेतील फुटीनंतर ‘धनुष्यबाण’ चिन्ह कुणाचं यावरून आता नवा वाद पाहायला मिळत आहे. मात्र, अश्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात काल (शनिवार) चार तास झालेल्या बैठकीनंतर, शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

शिवसेना हे पक्षाचे मूळ नाव वापरण्यासही दोन्ही गटांना मनाई करण्यात आली आहे. आता दोन्ही गटांना स्वत:च्या पक्षासाठी नव्या नावाची आणि नव्या निवडणूक चिन्हाची निवड करावी लागणार आहे.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. कालपासून विविध नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“ज्याची भीती होती तोच निर्णय दिला गेल्याचं’ शरद पवार यांनी म्हटलं आहे. योग्य निर्णय दिले जातील याची आता खात्रीही नाही, असा टोला देखील पवरांनी यावेळी लगावला आहे.

ठाकरेंची शिवसेना संपणार नाही, तर पक्ष अधिक जोमाने वाढेल असं पवार यांनी म्हटलं आहे. तसेच महाविकास आघाडी कायम राहणार असल्याचंही शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितलं.