कोरोना महामारी, अर्थव्यवस्थेचा घसरता आलेख, वाढती बेरोजगारी तथा महागाईच्या मुद्यावरून जनमाणसांत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात रोष वाढत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आतापासूनच विरोधकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे.

त्यांनी सोमवारी सुप्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याशी बंद दरवाज्याआड चर्चा केली. त्यानंतर लगेचच मंगळवारी काँग्रेसेतर विरोधी पक्षांची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या वाढत्या सक्रियतेमुळे ते देशाला तिसऱ्या आघाडीचा पर्याय देण्याच्या प्रयत्नांत असल्याची चर्चा आहे.

प्रशांत किशोर यांनी गत ११ तारखेलाच शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी सोमवारी पुन्हा त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. सूत्रांच्या माहितीनुसार,

Advertisement

या दोघांत पवारांच्या येथील निवासस्थानी दीड तास चर्चा झाली. बंद दरवाज्याआड झालेल्या या चर्चेमुळे हे दोघेही भाजपविरोधात तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नांत असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मुंबईत पवार यांची भेट घेतली होती आणि काल (सोमवारी) दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असून या भेटीत त्यांनी देशात राजकीय परिस्थिती काय आहे, याची माहिती त्यांच्याकडे जी उपलब्ध होती ती दिल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

आज मोजक्या पक्षांसोबत चर्चा होणार असून त्यानंतर हळूहळू इतर पक्षांना कसं एकत्र आणता येईल त्याबाबतीत हे नेते बसून ठरवणार आहेत असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

Advertisement