शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे पत्रकार परिषदेत जाहिर केले.शुक्रवार (दि.११) रोजी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

जांभळकर यांचा सभापतीपदाचा कार्यकाळ पूर्ण झाला असल्याने त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकाळात केलेल्या कामांची माहिती दिल्यानंतर सभापदीपदाचा राजीनामा दिला असल्याचे यावेळी जाहीर केले.

यामध्ये प्रामुख्याने सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना विमा पॉलिसी, पाबळ उपबाजाराची स्थापना, कर्मचाऱ्यांना विमा कवच, ईनाममुळे आणि मापाडी ॲपमुळे पारदर्शक कारभार, शेतमालाचे जाहीर लिलाव, तेलबियांच्या बाजारासाठी चालना, तीन दिवसांचा कांदा बाजार पाच दिवसासाठी वाढवणे,

कोविड सेंटरला मदत, मुख्य द्वार सुशोभिकरण,यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या यांसारखे शेतकऱ्यांच्या हिताचे विकासात्मक उपक्रम राबवून सभापतीपदाच्या कार्यकाळात बाजार समिती नफ्यात आणली असल्याचे जांभळकर म्हणाले.

यावेळी आमदार अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, तालुकाध्यक्ष रविंद्र काळे, माजी सभापती प्रकाश पवार, शशिकांत दसगुडे, संचालक आबासाहेब मांढरे, प्रविण चोरडीया, बंडु जाधव, सतिष कोळपे, सुदीप गुंदेचा, सचिव अनिल ढोकले यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.