मुंबई – महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात शिंदे सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या या भूमिकेमुळे शिवसेनेत मोठा पेच निर्माण झाला असून, दिवसागणित अनेक अडचणी निर्माण होत आहे. सध्या शिंदे गट (Shinde Group) आणि उद्धव ठाकरे यांच्यात आम्हीच खरी शिवसेना आहोत असा दावा सतत करण्यात येत आहे.

दरम्यान, शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व फुटीचे सावट यंदाच्या दसरा मेळाव्यावरदेखील (Shivsena Dasara Melava) दिसू लागले आहे.

शिवाजी पार्कमध्ये दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. मात्र यंदा दसरा मेळावा कोणाचा असणार एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे असा नवा वाद आता निर्माण झाला आहे.

शिवसेना आणि दसरा मेळावा हे अतूट नातं आहे. दसरा मेळावा हा शिवसेनेची ओळख आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thakre) यांनी या परंपरेची सुरुवात केली होती.

बाळासाहेब ठाकरे (balasaheb thakre) यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दरवर्षी दसरा मेळाव्यात संबोधित करत असतात. मात्र, यंदा दसरा मेळावा वरून नवा वाद सुरु झाला आहे.

दरम्यान, दसरा मेळाव्यावरून दोन्ही गट आमने-सामने आले असताना या प्रकरणावर प्रथमच मनसेच्या (mns) वतीने प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

“वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो’, हे दोन्ही गटांनी लक्षात घ्यावं असा टोला मनसेने लगावला आहे. सध्या मनसेचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘शिवतीर्थ’वर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे!

आजच्या घडीला दोनही गटांचे त्यावरून घमासान चालू आहे पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे “वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो” असं ट्विट संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केलं आहे.

तर दुसरीकडे काहीही झालं तरी शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार असं शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी म्हटलं आहे.