मुंबई – शिवसेनेत (Shivsena) अभूतपूर्व फूट पडली असून, यामध्ये आता दोन वेगळे गट पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या नेतृत्वातील गटाने आपला गटच शिवसेना असल्याचा दावा केला आहे. तर दुसऱ्या बाजूला पक्षात झालेल्या मोठ्या बंडखोरीनंतर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अनेक प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, शिवसेनेत झालेल्या या अभूतपूर्व फुटीचे सावट यंदाच्या दसरा मेळाव्यावरदेखील (Shivsena Dasara Melava) दिसू लागले आहे.

शिवाजी पार्कमध्ये दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. मात्र यंदा दसरा मेळावा कोणाचा असणार एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे असा नवा वाद काही दिवसांपूर्वी निर्माण झाला होता.

शिवसेना आणि दसरा मेळावा हे अतूट नातं आहे. दसरा मेळावा हा शिवसेनेची ओळख आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thakre) यांनी या परंपरेची सुरुवात केली होती.

बाळासाहेब ठाकरे (balasaheb thakre) यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दरवर्षी दसरा मेळाव्यात संबोधित करत असतात. मात्र, यंदा दसरा मेळावा कोण घेणार यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात होते.

दरम्यान, अशातच आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यापूर्वी एक टीझर लाँच केला असून सध्या दोन्ही गटांचे हे टिझर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी गुरुवारी आणि शुक्रवारी टीझर लाँच केले आहेत. गुरुवारी लाँच केलेल्या टीझरमध्ये ‘एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ’ अशा ओळी आहेत. टीझरमध्ये शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजाचा वापर करण्यात आला आहे.

तर, आज शिवसेनेकडूनही दसरा मेळाव्याचा टीझर लाँच करण्यात आला. टीझरच्या सुरुवातीला ‘निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार’ अशा ओळी असून शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचा वापर दिसून येत आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाजात ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’ अशी साद आहे. त्याशिवाय, दसरा मेळावा, शिवसेनेच्या जाहीर सभेतील दृष्ये आहेत. शिवसेनेच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर हा टीझर लाँच करण्यात आला आहे.

दरम्यान, दसरा मेळाव्याचा दिवस जस जसा जवळ येईल तसा टीझर, पोस्टर वॉर आणखी रंगण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने बीकेसी मैदानावरील दसरा मेळाव्याचा टीझर लाँच केला.

तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा टीझर लाँच केलाय. सध्या हे दोन्ही टिझर चांगलेच चर्चेत असल्याचे दिसून येत आहे.