मुंबई – शिवसेनेत (Shivsena) अभूतपूर्व फूट पडली असून, यामध्ये आता दोन वेगळे गट पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या नेतृत्वातील गटाने आपला गटच शिवसेना असल्याचा दावा केला आहे. तर दुसऱ्या बाजूला पक्षात झालेल्या मोठ्या बंडखोरीनंतर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अनेक प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, शिवसेनेत झालेल्या या अभूतपूर्व फुटीचे सावट यंदाच्या दसरा मेळाव्यावरदेखील (Shivsena Dasara Melava) दिसू लागले आहे.

शिवाजी पार्कमध्ये दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. मात्र यंदा दसरा मेळावा कोणाचा असणार एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे असा नवा वाद काही दिवसांपूर्वी निर्माण झाला होता.

शिवसेना आणि दसरा मेळावा हे अतूट नातं आहे. दसरा मेळावा हा शिवसेनेची ओळख आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thakre) यांनी या परंपरेची सुरुवात केली होती.

बाळासाहेब ठाकरे (balasaheb thakre) यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दरवर्षी दसरा मेळाव्यात संबोधित करत असतात. मात्र, यंदा दसरा मेळावा कोण घेणार यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात होते.

दरम्यान, अशातच आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यापूर्वी एक टीझर लाँच केला असून सध्या दोन्ही गटांचे हे टिझर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

शिंदे गट आम्हीच बाळासाहेबांची विचारधारा पुढे नेत असल्याचा दावा करते आहे, तर उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदे गट गद्दार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, आता यावरूनच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या “सामना’च्या रोखठोकमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात करण्यात आला आहे.

नेमकं काय म्हटले आहे? वाचा…

“एकनाथ शिंदे (eknath shinde) हे दिवंगत आनंद दिघे (anand dighe) यांच्या नावाचा गैरवापर करत’ असल्याचा आरोप रोखठोकमधून करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात वातारण तापले आहे.

“महाराष्ट्रात उभी फूट पाडण्यासाठी शिंदे यांनी आज हयात नसलेल्या स्व. आनंद दिघे यांचा आधार घेतला. दिघे यांची आठवण शिंदे यांना 21 वर्षांनंतर झाली.

दिघे यांच्या आपण किती निकट होतो हे दाखविण्यासाठी शिंदे यांनी काही कोटी खर्च करून ‘धर्मवीर’ (dharamveer) सिनेमा काढला. सिनेमावर खर्च झाला त्यापेक्षा जास्त खर्च सिनेमाच्या म्हणजे स्वतःच्या प्रसिद्धीवर केला.

हा सिनेमा आनंद दिघे यांच्यावर होता की शिंद्यांवर, असा प्रश्न हा सिनेमा पाहून अनेकांना पडला. कारण या सिनेमाचे प्रयोग सुरू असतानाच शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या पाठीत खंजीर खुपसला व शिवसेना फोडली.

शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून टीव्हीवर या सिनेमाचा भडीमार सुरू आहे, तो फक्त शिंदे यांच्या प्रसिद्धीसाठी. अशी टीकाही मुख्यमंत्र्यांवर करण्यात आली आहे.