कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या दहावी इयत्तेतील मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार (Pune Suicide Case) शुक्रवारी रात्री उघडकीस आला आहे.

आदी अमित कर्वे (वय १५, रा. काकडे सिटी, कर्वे रस्ता) असं आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. या मुलाच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

वारजे माळवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदी, त्याचे आई-वडील व बहीण असे चौघेजण काकडे सिटी परिसरात राहतात. आदीचे वडील एका खासगी बॅंकेत नोकरीस आहेत, तर आई एका शाळेत शिक्षिका आहे.

Advertisement

मोठी बहीण महाविद्यालयात शिक्षण घेते. आदी जवळच्याच एका शाळेमध्ये दहावीमध्ये शिक्षण घेत होता.शुक्रवारी घरातील सर्वजण आपापल्या कामानिमित्त बाहेर गेले होते.

सायंकाळी आदीची बहीण घरी आली, तेव्हा तिला आदी गळफास घेतलेल्या अवस्थतेत आढळून आला. तिने याबाबत तत्काळ आई-वडिलांना सांगितलं.

त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच आदीचा मृत्यू झालेला आहे असं रुग्णालयाने कळवले.

Advertisement

घडलेल्या घटनेबाबत वारजे माळवाडी पोलिसांना माहिती देण्यात आली. आदीने आत्महत्या का केली, याबाबतचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी वारजे पोलीस अधिक तपास करत आहेत.