सिंहगड रोडवरील हिंगणे खुर्र्द येथे एकट्या राहणार्‍या ७० वर्षीय महिलेच्या डोक्यात कठीण वस्तूने मारुन त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

चोरट्याने घरातील १ लाख ७० हजार रुपयांचे दागिने चोरुन नेण्यात आले आहेत. हा प्रकार त्यांच्या ओळखीच्यांपैकी कोणीतरी केला असावा असा पोलिसांना संशय आहे.

शालिनी बबन सोनावणे (वय ७०, रा. सायली अपार्टमेंट, केदारीनगरी, हिंगणे खुर्द) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.

Advertisement

याप्रकरणी त्यांचा मुलगा विराट बबन सोनवणे (वय ३९) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ही घटना शनिवारी रात्री १० वाजता उघडकीस आली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शालिनी सोनवणे या एकट्याच रहात होत्या. त्यांचा मुलगा हा जवळच्या इमारतीत राहतो.

काल रात्री तो आईच्या घरी गेल्यावर त्यांना आई हॉलमध्ये पडली असल्याचे दिसून आले. त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस घटनास्थळी पोहचले. शालिनी यांच्या डोक्यात कठीण वस्तूने मारुन त्यांचा खून केला असावा, असा संशय आहे.

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयाला पाठविला आहे.

Advertisement