सध्या मुंबई, पुण्यासह राज्यातील बहुतांश शहरात पेट्रोलचा प्रतिलीटर दर 107 रुपयांच्या पलीकडे गेला आहे.
असे असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून एक रुपयांत पेट्रोल पेट्रोल वाटप करण्यात आले. धानोरीत हे स्वस्त पेट्रोल घेण्यासाठी पेट्रोल पंपाबाहेर दुचाकीच्या रांगा लागल्या होत्या.
एका रुपयात एक लीटर पेट्रोल !
पेट्रोल दरवाढीसाठी केंद्र सरकार कसे जबाबदार आहे, हे अजित पवार यांनी वारंवार दाखवून दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसनं महागाई विरोधात अनेक वेळा आंदोलनही केलं आहे.
पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक रुपये दराने एक लिटर पेट्रोल देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारला एक प्रकारे चपराक देण्याचा प्रयत्न केला आहे. हा उपक्रम जाणता राजा प्रतिष्ठान आणि शशिंकात टिंगरे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला.
मुख्यमंत्री निधीला मदतीचे आवाहन
देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप सुरु आहे. अनेक जवळची माणसं आपल्याला सोडून जात आहेत. अशावेळी थाटामाटात वाढदिवस साजरा करणं उचित नाही.
त्यामुळे यंदा साधेपणाने वाढदिवस साजरा करत कार्यकर्ते, शुभचिंतकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचं अजित पवार यांनी केलं होतं.
बीडमध्ये महाआरोग्य शिबीर
पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याकडून राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजितदादांच्या वाढदिवसाला रुग्णसेवा करण्याचा संकल्प केला.
त्यांनी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करत या शिबिराच्या माध्यमातून मोफत अँजिओप्लास्टी-अँजिओग्राफी करण्याचा त्यांचा मानस आहे.
अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काकू-नाना मेमोरीअल हॉस्पिटल आणि स्व. मोतीरामजी वरपे कार्डियाक युनिट (जालना रोड बीड) येथे मोफत अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी या मराठवाडास्तरीय मोफत महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आ. प्रकाश सोळंके यांनी केलं.