जात पंचायतीच्या विरोधात कायदा होऊन चार वर्षे पूर्ण झाली असली, तरी जात पंचायतींना मूठमाती मिळायला तयार नाही. उलट त्यांची दांडगाई वाढत चालली आहे.

जात पंचायतीच्या माध्यमातून कुटुंबाला समाजातून बहिष्कृत केल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

भोसरी पोलिसांची कारवाई

मोशीमध्ये हा प्रकार घडला असून भोसरी एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली. भोसरी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. इचलकरंजी येथील सुशांत नगरक यांनी याबाबत फिर्याद दिली होती.

Advertisement

घरजावई होण्यासाठी गळ

मिळालेल्या माहितीनुसार सुशांत नगरक यांचे 21-11-2019 रोजी कंजारभट समाजातील मुलीशी हिंदू पद्धतीने लग्न झाले. सुशांत यांनी त्यांची पत्नी गरोदर राहिल्यानंतर तिला माहेरी पाठवले.

मार्च महिन्यात सुशांत यांच्या सासरच्या कुटुंबीयांनी त्यांच्या पत्नीला मोशी येथील घरी आणले. त्यानंतर वारंवार विनंती करूनही सुशांत यांच्या पत्नीला त्यांच्या सासरचे लोक परत पाठवत नव्हते.

सुशांत यांनी त्यांच्या सासरच्या मंडळींकडे विचारणा केली. त्यानंतर सासरच्या मंडळींनी सुशांत यांना घरजावई होण्याची गळ घातली.

Advertisement

साडेपाच हजार रुपये भरण्याचे फर्मान

सुशांतने घऱजावई होण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांना मोशी येथे बोलवण्यात आले. मोशीमध्ये जात पंचायत भरवण्यात आली. या जात पंचायतीत सुशांत यांना साडेपाच हजार रुपये दंड म्हणून भरण्यास सांगितले.

सुशांत यांनी ही रक्कम भरण्यास नकार दिला; परंतु सुशांत यांच्या नातेवाइकांनी साडेपाच हजारांचा हा दंड भरला; मात्र जात पंचायतीने सुशांत आणि त्यांच्या नातेवाइकांना आणखी 15 लाख रुपयांचा दंड भरण्यास सांगितले.

हा दंड सुशांत यांनी भरण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर तसेच त्यांच्या कुटुंबीयांवर बहिष्कार टाकण्याचा आदेश जात पंचायतीने दिला. जात पंचायतीचा अध्यक्ष हा सुशांत यांच्या पत्नीचा चुलता आहे.

Advertisement

यांना केली अटक

भोसरी एमआयडीसीमध्ये जात पंचायतीविरोधात आणि सुशांत यांच्या सासरच्या कुटुंबीयांविरोधात फिर्याद देण्यात आली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये विजय गागडे, भूपेंद्र तामचिकर, परमानंद अभंगे, सुभाष माचरे यांचा समावेश आहे.

Advertisement