बेरोजगारी, कौटुंबिक वादविवाद, पती-पत्नीची भांडणे, नैराश्य आणि व्यसनाधीनतेमुळे गेल्या साडेचार वर्षांत येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत तब्बल ९७ जणांनी आत्महत्या करून जीवन संपविले आहे. यामध्ये ७० तरुण आणि २७ महिलांचा समावेश आहे.

सर्वाधिक आत्महत्या गळफासाने

पूर्व भागातील येरवडा परिसरात दाट लोकवस्ती आणि झोपडपट्टीचा परिसर आहे. गांधीनगर, जयप्रकाशनगर, गाडीतळ, मदर तेरेसानगर, सिद्धार्थनगर, वडार वस्ती, कंजार भाट वस्ती, सुभाषनगर, रामनगर, कामराजनगर, संपूर्ण लक्ष्मीनगर, जयजवान नगर, पांडू लमाण वस्ती, पर्णकुटी पायथा या भागांत मोठ्या प्रमाणावर दाट लोकवस्ती आहे.

येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा भाग येत असून, गेल्या साडेचार वर्षांत विविध कारणांमुळे ९७ जणांनी आत्महत्या केली आहे.

Advertisement

यामध्ये राहत्या घरात गळफास लावून घेणे, कीटकनाशक प्राशन करणे, नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची नोंद आहे. गळफास घेऊन सर्वाधिक जणांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

वेळीच उपाययोजना करण्याची गरज

काही दिवसांपूर्वी पत्नीशी भांडण झाल्याच्या रागातून पतीने कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणाला दोन मुलगे असून, ती महाविद्यालयात शिक्षण घेतात.

त्यानंतर काही दिवसानंतर एका विवाहित तरुणाने दारूच्या नशेत राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविले. वडिलांच्या मृत्यूमुळे कुटुंब उघड्यावर पडले आहे.

Advertisement

येरवड्यात दर वर्षी अनेक तरुण, पती किंवा पत्नी आत्महत्या करून जीवन संपवत आहेत. येरवड्यातील वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासन आणि पालकांना वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे; अन्यथा भविष्यात आणखीन कुटुंबे उद्ध्वस्त होऊ शकतात.

या कारणांचा समावेश…

गरीब आणि हलाखीच्या परिस्थितीत कष्ट करून मुलांना लहानाचे मोठे केल्यावर मुले आत्महत्या करत असल्याने अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळत आहे.

विवाहित तरुणांच्या आत्महत्येमुळे मुलांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपत असून, कुटुंब उघड्यावर पडण्याचे प्रमाण वाढत आहे. बेरोजगारी, व्यसनांचे प्रमाण, ताणतणाव, किरकोळ वाद, कलह ही आत्महत्येमागची प्रमुख कारणे आहेत.

Advertisement

सतत संवादावर भर हवा

आजच्या घडीला बेरोजगारी, वादविवाद आणि व्यसनांचे वाढते प्रमाण यामुळे तरुण पिढीत मोठ्या प्रमाणावर नैराश्य वाढले आहे.

वाढत्या नैराश्यामुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले असल्याचे निरीक्षण आहे. त्यामुळे पालकांनी घरातील मुलांशी सतत संवाद साधला पाहिजे. तरुणांमध्ये व्यसनांचे प्रमाण मोठे असल्याने त्यांना मानसिक आधार देऊन वैद्यकीय उपचार देणे गरजेचे आहे.

 

Advertisement