विविध राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. त्यांच्यांशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर राऊत यांनी प्रताप सरनाईक यांच्याबाबत लवकरच तुम्हाला बातमी मिळेल, असे सूचक वक्तव्य केले.
सरनाईक शिवसेनेतच राहणार
प्रताप सरनाईकांशी दोन दिवसांपूर्वी फोनवरुन बोललो, त्यांनी खुलासा केला, मी माझ्या भावना व्यक्त केल्या.
त्या व्यक्त करत असताना सरनाईकांनी स्पष्टपणे सांगितलं, मी आजन्म शिवसेनेतच राहीन, आणि शिवसेनेतच मरेन. प्रताप सरनाईकांबाबत लवकरच तुम्हाला बातमी मिळेल, असे राऊत यांनी म्हटले.
ईडीच्या कारवाईवर लक्ष
ईडीच्या कारवाईवर आमचं लक्ष आहे. केंद्रीय पातळीवर दबाव असू शकतो. प्रताप सरनाईकांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
आम्हाला जाणवलं काही केंद्रीय यंत्रणा जाणूनबुजून ‘वडाचं साल पिंपळाला’ लावण्याच प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातील जनतेने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे राऊत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री रिलॅक्स
पक्षप्रमुख हे मुख्यमंत्री आहेत. आज माझी चर्चा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संघटनात्मक बांधणीबाबत झाली.
संघटना बळकट असेल तर सरकार आहे त्यापेक्षा मजबूत होईल, सरकार प्रदीर्घ काळ टिकेल, मुख्यमंत्री आमचाच राहील. त्यासाठी संघटनात्मक चर्चा झाली.
अनेक विषय महाराष्ट्रात सुरु आहे, मुख्यमंत्री रिलॅक्स आहेत, विधानसभा अधिवेशनाची त्यांची तयारी सुरू आहे, असे राऊत यांनी म्हटले.
‘शरद पवारांच्या भूमिकेत काहीही गैर नाही’
शरद पवार यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार राऊत यांनी केला. शरद पवारांचा एक मेसेज होता, की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चांगलं काम करत आहेत, त्यांची लोकप्रियता वाढत आहे, त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल.
तिसऱ्या आघाडीत शिवसेना-काँग्रेस असावी असं पवार म्हणाले त्यात चूक नाही. आज आम्ही यूपीएत नाही आणि एनडीएतही नाही.
देशपातळीवर विरोधी पक्षांची भक्कम आघाडी पर्याय म्हणून उभी राहात असेल, तर पवारांच्या भूमिकेत चूक नाही, असे राऊत यांनी म्हटले.