पुणे – एसटी कर्मचाऱ्यांसाठी (Maharashtra State Transport Employee) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी एसटी महामंडळाने 118 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं होतं. मात्र, आता हे सर्व कर्मचारी पुन्हा एकदा आपल्या कामावर रुजू होणार आहेत. या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा सेवेत घेण्याचे (Maharashtra State Transport Employee) आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

यानंतर या सर्व कर्मचाऱ्यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या घराबाहेर जल्लोष केला. ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळत एसटी कर्मचाऱ्यांनी आपला आनंद व्यक्त केला. यावेळी अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनीही राज्य सरकारचे आभार देखील मानले.

विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी तब्बल 175 दिवसांचा संप केला होता. या संपकाळात एसटी महामंडळाने 10 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले होते.

याच काळात संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) मुंबईतील घरावर मोर्चा काढत हल्ला चढवला होता. या हल्ल्यातील 118 जणांना पोलिसांनी अटकही केली होती.

दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना मुदतीत कामावर हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, हे 118 कर्मचारी तुरुंगात असल्याने वेळेत हजर होऊ शकले नाहीत, त्यामुळे त्यांची बडतर्फी कायम राहिली होती.

दरम्यान, गुरुवारपासून सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या सरकारचे आभार मानले. तसेच सदावर्ते यांचे देखील आभार मानले. यावेळी गुलाल उधळून कर्मचाऱ्यांनी आपला आनंद साजरा केला.