शिवनेरी बस भाड्यानं घेतल्याचा अनुभव ताजा असताना आणि बस भाडेतत्त्वावर घेण्यास एस टी कामगार संघटना आणि प्रवाशी संघटनांचा विरोध असताना भांडवलाअभावी एसटीची दारूण स्थिती झाल्याने आता आणखी पाचशे बस भाड्यानं घेण्याच निर्णय एसटी महामंडळाच्या संचालक मंडळानं घेतला आहे.

पाचशे बस प्रवासी सेवेत दाखल होणार

देशातील सर्वांत मोठे परिवहन महामंडळ असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) खासगीकरणाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.

एसटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ५०० साध्या गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. यानुसार या गाड्या प्रवासी सेवेत दाखल होणार आहेत.

Advertisement

बस, चालक खासगी; वाहक महामंडळाचा

एसटीच्या ताफ्यातील पाच हजारांहून अधिक गाड्यांचे आयुर्मान पूर्ण झाल्याने नव्या गाड्यांची महामंडळाला तातडीची गरज आहे.

हजारो कोटी रुपयांचा तोटा आणि कोरोनाकाळात घटलेले उत्पन्न यामुळे नवीन गाड्या घेणे शक्य नाही. यामुळे ‘शिवशाही’प्रमाणे चालक, बस खासगी आणि वाहक महामंडळाचा यानुसार गाड्या ताफ्यात दाखल होतील.

कामगाराच्या नोकरीवर गदा नाही

महिन्याभरात या बससाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून तातडीने या बस प्रवासी सेवेत दाखल होतील.

Advertisement

खासगी बसचा समावेश होणार असला, तरी एकाही एसटी कामगाराच्या नोकरीवर गदा येणार नाही, असे एसटी महामंडळाने म्हटले आहे.

एसटीला प्रतिसाद वाढतोय

सध्या महामंडळाच्या ताफ्यात १६ हजार ५०० बस आहेत. यात वातानुकूलित, साधी, शयनयान, शयन-बैठे आसन, मिडी यांचा समावेश आहे.

राज्य परिवहन महामंडळाला १०० टक्के प्रवासी क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची मुभा राज्य सरकारने दिली आहे.

Advertisement

एसटी प्रवासाला आरटी-पीसीआर अहवाल, लसीकरण प्रमाणपत्र याची आवश्यकता नाही. यामुळे काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये एसटी प्रवासी वाहतुकीस चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आयुर्मानाचा प्रस्ताव फेटाळला

एसटी महामंडळातील सर्व प्रकारच्या वाहनांचे कमाल आयुर्मान १५ वर्षे निर्धारित करण्याचा ठराव यंत्र व अभियांत्रिकी खात्याने मांडला होता; मात्र तो फेटाळण्यात आला. जुन्या गाड्यांचे ब्रेकडाउन होण्याचे प्रमाण जास्त असते.

या गाड्यांचा अपघात झाल्यास प्रवाशांना गंभीर दुखापत होण्याचा धोकाही अधिक असतो. यामुळे संचालक मंडळाच्या बैठकीत हा ठराव फेटाळण्यात आला.

Advertisement