खेड तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे तीन तेरा वाजले आहेत. लसींचा साठा उपलब्ध असूनही दुसऱ्या डोसचा फेरा ८४ दिवसांवर आडकल्याने लसीकरण मोहीम असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.

दहा प्राथमिक आरोग्य केंद्रात ८०० डोस बुधवारी (दि.१९ मे ) सोशल मीडियावर वाजत गाजत आले. त्यामुळे नागरिकांनी गर्दी केली. तीन चार तास रांगा लावल्या. तिकडे ऑनलाईन नोंदणीवर पहिला डोस देवून ८४ दिवस झाले. अशाच नागरिकांना दुसरी लस टोचली जाणार असल्याचा सरकारी फतवा निघाला.

त्यामुळे लसीकरण केंद्रावर चांगलाच गोंधळ उडाला. नागरिकांनी आरोग्य केंद्रावरील उपस्थित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. दरम्यान, लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांची नोंदणी ऑनलाईन सुरू आहे. आतापर्यंत १२८ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

Advertisement

तालुक्यासाठी १५० लसी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर १,५०० हून अधिक नागरिक लसीच्या प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती खेड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.

दरम्यान, तालुक्यात आज अखेर १ लाख ९ हजार १३५ जणांचे लसीकरण २५ मे अखेर झाले आहे. फ्रन्टलाइन वर्कर पैकी १२ हजार ९७६ जणांचा पहिला तर ३ हजार ३२७ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. यामध्ये आरोग्य क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ३ हजार ८८ पहिला डोस तर १ हजार ७९१ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

तर साठ वर्षाच्या पुढील ३६ हजार २९८ जणांचा पहिला डोस तर अवघ्या ६ हजार ५५६ जणांचा दुसरा डोस झाला आहे. ४९ ते ५९ वयोगटातील ३८ हजार ७३३ जणांना पहिला डोस मिळाला आहे. तर ४ हजार ८८५ नागरिकांनी दुसरा डोस तारेवरची कसरत करून घेतला आहे.

Advertisement