कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या आकडेवारीत दररोज तफावत दिसत होती. उशिरा माहिती देणे, माहिती अपलोड न करणे असे प्रकार घडत होते.

जिल्हा स्तरावर अपडेट न झालेली माहिती भरण्याचे आदेश दिल्यानंतर गेल्या महिन्याभरात राज्यात कोरोनामुळे झालेल्या; परंतु सहा महिने नोंद न झालेल्या आकड्यांचे समायोजन करण्यात आले. त्यात वीस हजार मृत्यूंची भर पडली.

मृत्यूची आकडेवारी लपविली जात असल्याचा आरोप

आरोग्य विभागाने गेल्या महिन्याभरात तब्बल वीस हजार मृत्यूंची नोंद केली आहे. तांत्रिक कारणांचा आधार घेऊन मृत्युसंख्या कमी दाखविण्यात आली होती.

Advertisement

गेल्या सप्टेंबरपासून जिल्हास्तरावर प्रसिद्ध होणाऱ्या आकडेवारीत आणि राज्य सरकारच्या अधिकृत आकडेवारीत साडेअकरा हजारांहून अधिक मृत्यूंची तफावत होती. महाराष्ट्र मृत्यूंची आकडेवारी लपवत असल्याचा संशयही त्यात व्यक्त केला होता.

मुख्यमंत्र्यांकडून झाडाझडती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः जातीने लक्ष घालून या प्रकरणी संबंधितांची झाडाझडती घेऊन, योग्य पद्धतीने आकडे जाहीर करण्याचे आदेश दिले होते.

नंतर आरोग्य विभागाने खुलासा करताना, मृत्यूच्या आकडेवारीचा ताळमेळ (रिकन्सिलेशन) दर पंधरा दिवसांनी घालण्यात येतो, असे म्हटले होते.

Advertisement

शासकीय यंत्रणा दुसऱ्या लाटेचा सामना करण्यात व्यग्र असल्याने; तसेच तांत्रिक बाबींमुळे या नोंदी करण्याचे राहून गेल्याचेही म्हटले होते. मृत्यूंचा आकडा लपविण्याचा सरकारचा प्रयत्न नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते.

ताळमेळ घालून नव्या नोंदी

मे महिन्यापासून ताळमेळ घालून नव्या नोंदी करण्यास प्रारंभ केल्याचेही खुलाशात म्हटले होते. त्यानुसार एका महिन्यात तब्बल २० हजार ५३९ मृत्यूंच्या नोंदी अद्ययावत करण्यात आल्या आहेत.

याच कालावधीमध्ये महाराष्ट्रात झालेल्या साडेआठ हजार मृत्यूंपेक्षा हे आकडे वेगळे आहेत. गेल्या पंचेचाळीस दिवसांचा आढावा घेतल्यास, ताळमेळ घालून करण्यात आलेल्या मृत्यूंच्या नोंदीचा आकडा २५ हजारांवर गेल्याचे सरकारी आकडेवारी सांगते.

Advertisement

पारदर्शकतेचा दावा फोल

मृतांच्या आकडेवारीत कोणतीही लपवाछपवी होत नसल्याचे मुख्यमंत्री ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वारंवार जाहीर केले आहे; पण आरोग्य यंत्रणेच्या ताळमेळाची त्यांना माहिती नव्हती, हे या दरम्यान स्पष्ट झाले. एक महिन्याच्या आकडेवारीनंतर, आरोग्य विभागाचा पारदर्शकतेचा दावा किती फोल होता, हे यातून दिसते.