मुंबईत आणि प्रवासात मुसळधार पाऊस सुरू असताना आषाढीनिमित्त पंढरपूरला होणा-या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबीयांसह स्वतः गाडी चालवित रवाना झाले. त्यांच्या हस्ते मंगळवारी पहाटे शासकीय महापूजा होणार आहे.

रस्तामार्गे प्रवास करण्याचा सल्ला

मुख्यमंत्र्यांच्या गाडीला चालक तसेच अन्य स्टाफ असतो. कॅनव्हाय असतो. लवाजमा असतो. मुख्यमंत्र्यांना खास विमानानं किंवा हेलिकाॅप्टरनंही जाता आलं असतं; परंतु मुंबईपासूनच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रवासाच्या मार्गावर अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता.

त्यामुळे मुंबईपासून पंढरपूरपर्यंत मुख्यमंत्री कार्यालयानं त्यांना रस्तामार्गे प्रवास करण्याचा सल्ला दिला होता. मुख्यमंत्री त्यांच्या कुटुंबीयांना घेऊन स्वतः वाहन चालवित पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले.

Advertisement

मुख्यमंत्र्यांचा साधेपणा

पूर्वी आषाढी वारीचे हेलिकाॅप्टरमधून फोटो काढणारे ठाकरे आता मुख्यमंत्री झाल्यानंतर साधेपणाने वागायला लागले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत होते. त्यांच्या शेजारी पत्नी रश्मी बसल्या होत्या.

दहा मानाच्या पालख्या रवाना

आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी पंढरपूरची ओढ लागलेली असते. हरिभक्तीच्या छंदात दंग होऊन, विठूनामाचा जयघोष करीत वारकरी पालख्या घेऊन पायी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात; मात्र वारी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे सावट कायम आहे.

आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील दहा मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. या पालखी सोहळ्यासाठी एसटी महामंडळाने मोफत शिवशाही बस दिल्या आहेत.

Advertisement

महापूजेचा मान कोलते दांपत्याला

आषाढी वारीच्या महापूजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71.) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60) महापूजा करतील.

केशव कोलते 20 वर्षापासून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विणेकरी म्हणून सेवा बजावत आहेत. त्या सेवेचं त्यांना महापूजेच्या निमित्तांन फळ मिळाल्याचं म्हणावं लागेल.

Advertisement