Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

कोरोनाबाधित महिलेच्या दागिन्यावर डल्ला

कोरोनाबाधितांच्या अंगावरच्या दागिन्यांच्या पुण्यात वारंवार चोर्‍या होत आहेत. रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांचाही त्यात हात असण्याचा संशय व्यक्त होत आहे.

सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर

कोथरूड येथील देवयानी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्ण असलेल्या महिलेला उपचारासाठी दाखल केल्यानंतर हातामधील एक लाख 35 हजार रूपये किंमतीच्या बांगड्या चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मोशी येथील 38 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्‍न त्यामुळे ऐरणीवर आला आहे.

उडवाउडवीचे उत्तरे

तक्रारदारांंच्या आईला 13 मे रोजी कोथरूड येथील देवयानी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले होते. त्या वेळी आयसीयूमधील नर्सने तक्रारदारांना त्यांच्या आईची दोन कर्णफुले, चार सोन्याच्या बांगड्या आणून दिल्या; पण तक्रारदारांंची आई नेहमी हातामध्ये सहा बांगड्या घालत असल्याचे त्यांना माहिती होते.

त्यामुळे त्यांनी नर्स व डॉक्टरांना विचारणा केली; पण त्यांना समाधानकारक माहिती मिळाली नाही. तक्रारदारांंच्या आईची तब्बेत खूपच खराब होती. त्यामुळे त्यांनीदेखील याप्रकरणाकडे जास्त लक्ष दिले नाही.

रुग्णालयातूनच चोरी

22 मे रोजी तक्रारदार यांच्या आईचे कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर तक्रारदारांनी घरी बांगड्या पाहिल्या. तसेच, हॉस्पिटलमध्येदेखील चौकशी केली; पण त्या सापडल्या नाहीत. त्या वेळी त्यांना हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमीट केल्यानंतर बांगड्या चोरल्याची तक्रार पोलिसांकडे दिली आहे. याप्रकरणी अलंकार पोलिस अधिक तपास करत आहेत.

 

Leave a comment