शहर व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शहरातील सर्व दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत उघडी ठेवण्याची मागणी केली होती; परंतु कोरोनाचा धोका अजूनही कमी झालेला नाही.

त्यामुळे दुकानांच्या वेळेत बदल करण्याबाबत आणि निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घेतला नाही.

याउलट चार वाजल्यानंतर फेरीवाले, हातगाडे यांच्यामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी या सर्वांना चारनंतर बंदी घातली आहे.

Advertisement

पुण्यात निर्बंध जैसे थे

पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या चालू असलेले कोरोनाचे निर्बंध यापुढेही जैसे थे ठेवण्यात आले आहेत. शहरातील दुकाने ही पूर्वीप्रमाणे दुपारी चार वाजेपर्यंतच उघडी ठेवता येणार आहेत.

शिवाय फेरीवाल्यांना चार वाजल्यानंतर बंदी घालण्यात आली आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणारे दुकानदार व नागरिकांवर कडक कारवाई करण्याचा आदेश पोलिसांना दिला असल्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

लसीचा पुरवठा कमी

पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा दर ४.९ टक्के, पिंपरी चिंचवडमधील ५ टक्के, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ७.३ टक्के इतका आहे. जिल्ह्याचा सरासरी कोरोनाबाधित दर हा सहा टक्के आहे. शिवाय संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे.

Advertisement

या बाबी विचारात घेता, बालकांसाठी उपचाराची सुविधा निर्माण केल्या आहेत. लसीकरण वाढवले जात आहे; परंतु लसीकरणाच्या तुलनेत केंद्र सरकारकडून लसीचा पुरवठा होत नसल्याचा आरोपही पवार यांनी या वेळी केला.

विकेंड लॉकडाऊन कायम

कोरोना प्रतिबंधासाठी राज्य सरकारने आठवड्यातील शेवटचे दोन दिवस (शनिवार व रविवार) विकेंड लॉकडाऊन लागू केलेला आहे. हा विकेंड लॉकडाऊन यापुढेही चालूच राहणार आहे.

सुट्टीच्या निमित्ताने पर्यटनस्थळी आणि तीर्थक्षेत्रावर नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. यामुळे विकेंड लॉकडाऊन शिथिल केला जाणार नाही, असे पालकमंत्री पवार यांनी सांगितले.

Advertisement