कोरोनाचं संकट अजून कायम आहे. मास्क घालण्यासाठी सरकारी यंत्रणांचाच दबाव असतो. कोरोनापासून संरक्षणासाठी मास्क उपयुक्त असतो. मास्कचा संपत्ती बळकावण्यासाठी दुरुपयोग केला जाऊ शकतो का, असं कुणाच्या डोक्यात आलं नसेल; परंतु पुण्यात असा दुरुपयोग केला गेला.
मास्क घालून दुसरीच बाई केली उभी
पुण्यातील कविता जाधव यांच्या नावावर असलेली सगळी मालमत्ता मास्कचा गैरउपयोग करून हडपण्याचा प्रयत्न झाला. तोही त्यांच्या पतीकडून.
आरोपी पतीने मास्कचा गैरफायदा उठवत पुण्यातील पत्नीच्या नावावर असलेली मालमत्ता स्वतःच्या नावावर केल्यानं पुण्यात या प्रकाराची जोरदार चर्चा आहे.
आरोपीने पत्नीच्या ऐवजी दुसऱ्याच महिलेला मास्क घालून पत्नी म्हणून दाखवलं आणि नोंदणी व मुद्रांक कार्यालयात पत्नीची सर्व मालमत्ता स्वतःच्या नावावर केली. पुणे पोलिसांनी या प्रकरणात तक्रार नोंद करून तपास सुरू केला.
फ्लॅट, दुकान आणि सामायिक मालमत्ता हडपली
पीडित महिलेचं नाव कविता जाधव, तर आरोपी पतीचं नाव राहुल जाधव असं आहे. हे दोघे पुण्यातील कात्रज भागात राहतात.
कविता यांच्या नावावर एक फ्लॅट आणि एक दुकान आहे, तर दोन फ्लॅट हे कविता आणि त्यांचे पती राहुल यांच्या सामायिक मालकीचे आहेत.
मागील वर्षी जुलै महिन्यात कडक टाळेबंदी असताना राहुल जाधव यांनी पत्नीच्या नावावर असलेली ही सगळी मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्याचा डाव आखला.
पॉवर ऑफ ॲटर्नी यांनी स्वतःच्या नावावर
आरोपी पतीने पत्नीची मालमत्ता आपल्या नावावर करण्यासाठी एका दुसऱ्याच महिलेला मास्क घालून ते नोंदणी आणि मुद्रांक कार्यालयात घेऊन गेले. तेथे बायकोची पॉवर ऑफ ॲटर्नी यांनी स्वतःच्या नावावर करून घेतली.
त्यासाठी बायकोची खरी कागदपत्रे त्यांनी वापरली; मात्र कोरोनाच्या भीतीमुळे नोंदणी आणि मुद्रांक विभागातील कर्मचाऱ्यांकडून कागदपत्रांवर असलेल्या फोटोमधील व्यक्तीच आपल्याकडे नोंद करण्यासाठी आली आहे का? हे पाहिलच गेलं नाही. त्याचाच फायदा आरोपी पतीने घेतला.