मुंबई – महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आता शिवसेनेला (shivsena) वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असून, देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आणि त्यामुळे आता राज्यात नवीन सरकार स्थापन झाले आहे.

दरम्यान, शिवसेनेमध्ये झालेल्या अंतर्गत बंडखोरीमुळे अडीच वर्ष सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) कोसळलं असल्याचं आपल्या सर्वाना माहित आहे. हे सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा मोठा वाटा होता.

त्यामुळे राज्यातून गेलेली सत्ता पुन्हा आणण्यासाठी शरद पवार आता कोणती रणनीती अवलंबणार याची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. आणि अश्यातच आता खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एक मोठं विधान केलं असून, पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या की.., “शरद पवार विरोधात गेले की दौऱ्यावर निघतात. पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही. काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात.” असं विधान त्यांनी केलं आहे. यावेळी त्या इंदापूर मध्ये बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या, “निवडणुकीत काय होतं हे आमच्यापेक्षा जवळून कोणी पाहिलेलं नाही. शरद पवारांचं 55 वर्षांचं राजकारण आणि समाजकारण पाहिलं तर त्यात जितके चढ आहेत तितकेच उतार आहेत.

55 वर्षांतील 27 वर्ष ते सत्तेत आणि 27 वर्ष विरोधात होते. पण मी नेहमी त्यांना महाराष्ट्राने तुम्हाला प्रचंड प्रेम दिलं आहे सांगते. पण विरोधात असताना महाराष्ट्राने सर्वात जास्त प्रेम दिलं आहे.” असं देखील सुप्रिया सुळे (Supriya Sule) यावेळी म्हणाल्या.