पुणे – पॉप्युलर फ्रण्ट ऑफ इंडियाच्या (Bann PFI) देशभरातील कार्यकारिणी सदस्यांवर छाप्यांचे सत्र राबवल्यानंतर, या संघटनेवर व तिच्या अनेक सहकारी संघटनांवर पाच वर्षांसाठी बंदी (Bann PFI) घातल्याची घोषणा केंद्र सरकारने केली. या संघटनेचे आयसिससारख्या जगभरात सक्रिय दहशतवादी संघटनेशी ‘लागेबांधे’ असल्याचा आरोप करत, दहशतवादविरोधी कायदा व बेकायदा कृती प्रतिबंध कायदा यांसारख्या कायद्यांखाली ही बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, पीएफआयवर बंदी घातली, त्याप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या ‘कट्टर हिंदुत्ववादी संघटने’ (rss) वरही बंदी घालावी, असे मत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी व्यक्त केलं होत.

अश्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील या विषावर आपलं मत व्यक्त केलं आहे. “जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अशा बंदीची कोणाची मागणी असेल तर या मागणीवर चर्चा व्हायला हवी’. असं त्या म्हणाल्या आहेत.

नेमकं सुप्रिया सुळे काय म्हणाल्या….

“केंद्र सरकारने पीएफआयवर लावलेल्या बंदीचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. तसेच जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अशा बंदीची कोणी मागणी असेल तर या मागणीवर चर्चा व्हायला हवी. कुठलीही गोष्ट करताना समाजात त्याची चर्चा झाली पाहिजे.

देशात ज्या काही गोष्टी होतील, त्या संविधानाच्या चौकटीत राहून केल्या पाहिजे. सर्वांना समान न्याय दिला पाहिजे”. अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

पुण्यात काही दिवसांपूर्वी पीएफआयच्या आंदोलनात पाकिस्तान जिंदाबाद अश्या प्रकारच्या अनेक घोषणा देण्यात आल्या होत्या. दरम्यान, पाकिस्तान जिंदाबाद नाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

यातलं कलम 153 सरकारी कामात अडथळा आणणे, कलम 109 चिथावणीखोर वक्तव्य करणे, कलम 120 ब कट तयार करणे, अशा कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.