पुण्यातील स्वच्छंद ॲडवेंचर फाउंडेशनच्या पाचव्या वर्धापनदिनाचे आैचित्य साधून गिर्यारोहक संघाने हिमाचल प्रदेशच्या स्पिती खो-यातील खामेंगर भागात ६,१६० मीटर उंचीच्या अनामिक शिखरावर नुकतीच यशस्वी चढाई केली.

बर्फाच्या भिंती पार करीत मोहीम फत्ते

अनिकेत कुलकर्णीच्या नेतृत्वाखाली तीन गिर्यारोहकांच्या संघाची निवड करण्यात आली होती. तीन जुलै रोजी संघ पुण्याहून मनालीमार्गे स्पिती व्हॅलीकडे रवाना झाला. दोन दिवसांचा ट्रेक करून चोम लेक जवळ संघाने बेस कँप लावला.

त्यापुढे संघाने ॲडव्हान्स बेस कॅम्प व कॅम्प १ लावत ५,५२६ मीटर वरील समीट कॅम्प गाठला. १६ जुलैला पहाटे अडीच वाजता शिखरमाथ्याकडे प्रस्थान केले.

Advertisement

वाटेतील १०० फूट उंचीची ५५-६० अंशाची आइस वॉल, कार्निसेड राइड व २०० मीटरचा धोकादायक ट्रॅव्हलर्स पार करत अखेर सकाळी ८ वाजून ४८ मिनिटांनी शिखरमाथा गाठण्यात यश आले.

या शिखरावरील प्रथम चढाई

ओमहर्ष जपे, संवेद मठपती, तृप्ती जोशी व अनिकेत कुलकर्णी या गिर्यारोहकांनी शिखरमाथा गाठला. ही या शिखरावरील प्रथम चढाई आहे.

या मोहिमेला हिमाचल प्रदेशातील ‘माउंटन एक्सपीडिशन’ या संस्थेची मदत झाली. संघाबरोबरच संस्थेच्या चंदी ठाकूर, इंद्र देव ठाकूर आणि राज कृष्ण यांनीही शिखारमाथा गाठला.

Advertisement

शिखराच्या नामकरणाची स्वच्छंदला संधी

या शिखराचे नामकरण करण्याची संधी स्वच्छंदला मिळणार आहे. पहाटेच्या सुमारास समिटच्या वाटेवरी १०० फुटांची आइस वॉल आणि समिट रीजवरील २०० मीटरचा धोकादायक ट्रॅव्हलर्स पार करण्याचा अनुभव थरारक होता, असे तृप्ती जोशी हिने सांगितले.

या मोहिमेत मला प्रथमच राउट ओपनिंग करण्याची संधी मिळाली, असे ओमहर्ष जपे म्हणाला. पहिल्याच मोहिमेत शिखरमाथा गाठण्याचा थरारक अनुभव अविस्मरणीय होता, असे संवेद मठपती याने सांगितले.

दुर्गम भागातील यशाने आंनद

खामेंगर व्हॅली हा दुर्गम भाग असून, या भागाची अतिशय अल्प माहिती होती. या शिखरावर प्रथमच चढाई असल्यामुळे मोहिमेच्या परिणामाबाबत अनिश्चितता होती.

Advertisement

त्याचबरोबर कोरोनाच्या निर्बंधांमुळे मोहिमेच्या पूर्वतयारीस पुरेसा वाव मिळाला नाही; तरीही संपूर्ण संघाने शिखरमाथा गाठल्यामुळे खूप आनंद झाला, अशी प्रतिक्रिया आयोजकांनी दिली.

 

Advertisement