पोलिसांची गुन्हेगारांच्या शोधाची मोहीम सुरू आहे. पुण्यात एकाच दिवशी दोन सराईत गुन्हेगार आणि एका तडीपार गुंडाला पोलिसांनी हत्यारांसह अटक केली आहे.

पाप्या जाधवच्या आवळल्या मुसक्या

गुन्हे शाखेचे पथक गस्त घालीत असताना पोलिस नाईक अमोल पवार यांना माहिती मिळाली, की तडीपार गुंड सूरज ऊर्फ पाप्या जाधव (वय २२, रा. कासेवाडी) हा कासेवाडी येथील पतसंस्थेजवळ उभा आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

सध्या पॅरोलवर बाहेर आलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार कोयता घेऊन तरुण मंडळाजवळ उभा आहे, अशी माहिती पोलिस हवालदार अजय थोरात यांना मिळाली. त्यावरुन पोलिसांनी रवी मनोज कोळी (वय २२, रा. कासेवाडी) याला कोयत्यासह पकडले.

जबरी चोरीतील गुन्हे

गुप्ती घेऊन १० नंबर कॉलनीजवळील पार्किंगमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार आझिम शेख उभा असल्याची माहिती पोलीस शिपाई तुषार माळवदकर यांना मिळाली. त्यानुसार आझिम सलीम शेख (वय २३, रा. कासेवाडी) याला गुप्तीसह पकडण्यात आले.

या गुन्हेगारांवर जबरी चोरी, घरफोडी, चोरी, वाहनचोरी असे गुन्हे दाखल आहेत. त्यांना पुढील तपासासाठी खडक पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.