राष्ट्रवादीला विश्वासात घेऊन निर्णय घ्या , शरद पवारांची मुख्यमंत्र्यांना सूचना

काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्ष निवडीचा आग्रह धरला जात आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा झाली. पावसाळी अधिवेशनात ही निवड होणार नाही, हे या चर्चेतून स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला विश्वासात घेऊन महत्त्वाचे निर्णय घ्या, अशी सूचना पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

विसंवादाच्या मुद्द्यांवर चर्चा

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या शिष्टाईनंतर पवार यांनी वर्षा निवासस्थानी ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीत विसंवादाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

त्याचवेळी महामंडळाचे वाटप, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार प्रताप सरनाईक आणि अन्य नेत्यांच्या विरोधात सुरू असलेली ईडीची कारवाई या मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा झाली.

बैठकांमागून बैठका

राऊत यांनी सोमवारी ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. या भेटीगाठीमुळे महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली असताना पवार यांनी वर्षा ठाकरे यांची भेट घेतली.

पवार हे ‘वर्षा’वर दाखल होण्यापूर्वी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हेदेखील वर्षावर पोहोचले होते. मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे हेही तेथे उपस्थित होते.

भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी रणनीती

देशमुख यांच्याभोवती ईडीचा फास आवळत चालला आहे. त्यांना ईडीने चौकशीसाठी पाचारण केले होते; मात्र ते हजर झाले नाहीत. त्यांनी तब्येत आणि कोरोनाच्या कारणास्तव ऑनलाईन चौकशी करण्याची मागणी केली तसेच वेळही वाढवून मागितली.

ईडीने जर देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई केली, तर त्यावर काय रणनीती आखावी यावर या बैठकीत चर्चा झाल्याचे कळते. सोबतच परिवहन मंत्री अनिल परब आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हेही ईडीच्या रडारवर आहेत.

याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चौकशीसाठीही भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे त्याला कसे प्रत्युत्तर द्यायचे यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.

कार्यपद्धतीवर पवारांची नाराजी

पवार हे मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. विशेषतः कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांना राहण्याची सोय व्हावी, म्हणून म्हाडाने शंभर सदनिका टाटा रुग्णालयाला दिल्या होत्या.

या सदनिकांच्या चाव्या पवार यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या; मात्र मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या मागणीवरून तडकाफडकी बदलला. ही बाब राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागली.

टाळेबंदीबाबतच्या निर्णयातील धरसोडपणावर पवार नाराज आहेत. टाळेबंदी कडक केल्याने व्यापारी नाराज आहेत. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसला विश्वासात घेऊन करावेत, असे पवारांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.