सातबारा उताऱ्यावर नावाची नोंद करण्यासाठी आठ हजार रुपये लाच घेताना एका तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि.१६) रंगेहाथ अटक केली. नसरापूरजवळील चेलाडी फाट्यावर पोलिसांनी ही कारवाई केली.

मुकुंद त्रिंबकराव चिरके (वय ३४) हे या तलाठ्याचे नाव आहे. तो सजा कोंदवडी (ता. वेल्हे) येथे तलाठी म्हणून कार्यरत होता.

तेथील एका जमिनीच्या व्यवहारामध्ये संबंधितांचे नाव सातबारा उताऱ्यावर लावण्यासाठी त्याने दहा हजार रुपये लाच मागितली होती. त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आलेल्या तक्रारीच्या तांत्रिक पडताळणीचे काम गेले काही दिवस सुरू होते.

तडजोडीअंती आठ हजार रुपयांची रक्कम चिरके याने निश्चित केली होती. ही रक्कम देण्यासाठी त्याने त्या व्यक्तीला बुधवारी दुपारी चेलाडी नाक्यावर बोलावले होते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेथे सापळा रचण्यात आला. पोलीस निरीक्षक सुनील बिले यांच्या नेतृत्वाखालील या पथकाने चिरके याला पैसे घेताना रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.