पुणे – रस्त्यावर थांबून अश्लिल हावभाव करणाऱ्या दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 4) तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथे जुना पुणे-मुंबई महामार्गावर करण्यात आली. सचिन संजीवन शिंदे (वय 29, रा. विश्रांतवाडी) यांनी तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 27 आणि 35 वर्षीय दोन महिलांच्या विरोधात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी (pune police) दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलांनी वेश्‍या व्यवसाय करण्याच्या उद्देशाने जुन्या पुणे मुंबई महामार्गावर थांबून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना लैंगिक हावभाव करून सार्वजनिक सभ्यतेचा भंग केला. तळेगाव दाभाडे पोलीस या पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, यापूर्वी पिंपरी-चिंचवड परिसरात अश्या प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच आळंदी चाकण रस्त्यावरती वाय जंक्शनच्या पुढे काही महिलांनी लैंगिक हावभाव करून शब्द उच्चारून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना अडथळा होईल व त्रास होईल असे वर्तन केले होते.

तसेच त्यांनी सार्वजनिक सभ्यतेचा भंग होईल असे कृत्य केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये दिघी पोलिसांनी पाच महिलांना ताब्यात घेतले होते.

सध्या शहरातील अनेक मध्यवर्ती भागांमध्ये आणि मुख्य रस्त्यांच्या कडेला अश्या प्रकारच्या घटना असून, सामान्य नागरिक आणि प्रवासी नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

त्यामुळे पोलिसांनी अश्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. अश्या प्रकारचे हावभाव करून परिसरात राहणाऱ्या लहान मुलांवर याचा वाईट परिणाम होत असून, हे सर्व गंभीर कृत्य असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहे.

दरम्यान, शहरातील बहुतांशी लॉजमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय सुरू असतानाही पोलिसांची याकडे दुर्लक्ष झाले आहे. वेश्या व्यवसायामुळे सुसंस्कृत शहराची प्रतिमा डागाळत चालली आहे. असे सुद्धा नागरिक सांगतात.