ज्येष्ठांच्या कल्याणासाठी राबविण्यात येत असलेल्या सरकारी योजनांची ज्येष्ठांना देण्यासाठी तालुकास्तरावर योजना माहिती कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत.

ठिकठिकाणी करमणूक केंद्र

जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी गाव, तालुका आणि जिल्हापातळीवर करमणूक केंद्र स्थापन करण्याचा निर्णय जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय संनियंत्रण समितीची बैठक झाली.

Advertisement

या बैठकीला जिल्हा सहायक आयुक्त ( सामाजिक न्याय विभाग) संगीता डावखर, सदस्य अरुण रोडे, चंद्रकांत महामुनी आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाइन

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय समाज रक्षा संस्था (एनआयएसडी), सामाजिक न्याय विभाग, राज्य सरकार आणि जनसेवा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन सुरू करण्यात आलेली आहे.

जनसेवा फाउंडेशनतर्फे ही सुरू केली असून ती टोलफ्री आहे. या हेल्पलाइनचा क्रमांक १४५६७ असा आहे.

Advertisement

पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या मदतीची गरज भासल्यास, त्यांनी या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले आहे.

ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण

पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, पंचायत समित्यांनी येत्या महिनाभरात हे सर्वेक्षण पूर्ण करावे आणि त्याबाबतचा अहवाल जिल्हा सहायक आयुक्त (सामाजिक न्याय) संगीता डावखर यांच्याकडे सादर करण्याचा आदेशही डॉ. देशमुख यांनी दिला आहे.

हेल्पलाइन क्रमांकाचे फलक लावणार

सामाजिक न्याय विभागाच्यावतीने ज्येष्ठांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनचा क्रमांक प्रत्येकाला माहीत व्हावा, यासाठी या क्रमांकाबाबतचे फलक सर्व नगरपालिका आणि पंचायत समित्यांच्या मुख्यालयासमोर दर्शनी भागात लावण्यात येणार आहेत. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.

Advertisement