कोरोनाच्या लसीकरणाच्या नावाखाली इंजेक्शनमधून सलाईन टोचणा-या टोळीची पाळेमुळे खणून काढण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे.

दोन हजार जणांची फसवणूक

मुंबईकरांची फसवणूक करणाऱ्या दहा जणांच्या टोळीस अटक केली आहे. या टोळीने २५ मे ते ६ जून कालावधीत विविध नऊ ठिकाणी बोगस लसीकरण मोहिमा राबवून तब्बल दोन हजार व्यक्तींची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

तसेच या गुन्ह्यांची तीव्रता लक्षात घेऊन पोलिसांनी चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.

तपासासाठी विशेष पथक

मुंबईत कांदिवली हेरिटेज सोसायटीसह इतर ठिकाणीही बोगस लसीकरणाचा प्रकार उघड झाल्यांनतर महापालिका आणि पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली आहे.

त्यात पोलिसांनी आत्तापर्यंत आठ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून १२ लाख ४० हजार रुपये रोख रक्कम जप्त केली आहे.

त्या संपूर्ण प्रकरणासाठी विशेष तपास पथक स्थापन केल्याचेही सहपोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले.

या ठिकाणी घेतली बोगस शिबिरे

३० मे रोजी कांदिवलीच्या हिरानंदानी हेरिटेज सोसायटीत ३९० जणांना बोगस लस दिल्याचे स्पष्ट होताच कांदिवली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

त्याचा तपास करत पोलिसांनी वेगवेगळ्या भागात झालेल्या बोगस लसीकरण मोहिमांचा शोध घेतला.

त्यातून हाती गवसलेल्या तपशीलाच्या आधारे कांदिवली, बोरिवली, खार, बांगूरनगर, वर्सोवा, भोईवाडा अशा सात पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविले गेले.

तसेच, मुंबईप्रमाणे ठाण्यातील नौपाडा आणि समता नगरमध्येही याचप्रकारे बोगस लसीकरण झाल्याचे उघड झाले.

बोगस लसीकरणाचे सूत्रधार

बोगस लसीकरणासाठी मुख्य सूत्रधार महेंद्र प्रताप सिंह (३९) आणि मनीष त्रिपाठी यांनी इतर साथीदारांसमवेत ही शिबिरे घेतल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर, पोलिसांनी महेंद्र प्रताप सिंह, संजय गुप्ता, चंदन सिंह, नितीन मोंडे, मोहम्मद करीम अकबर अली, गुडिया यादव, शिवराज पटारिया, निता पटारिया, श्रीकांत माने, सीमा अहुजा अशा दहा जणांना अटक केली आहे.

तसेच, अन्य काही आरोपींचा शोध सुरू आहे. या संपूर्ण धक्कादायक प्रकारात फसवणुकीच्या माध्यमातून मिळवलेली १२ लाख ४० हजारांची रोख रक्कम आणि १४४ बनावट प्रमाणपत्रे हस्तगत केली आहेत.

डॉक्टर दाम्पत्यास अटक

मुख्य म्हणजे बोगस लसीकरणासाठी वापरण्यात आलेल्या लसींचा पुरवठा हा कांदिवलीतील शिवम रुग्णालयातून झाल्याचेही उघड झाले.

तेव्हा पोलिसांनी लगेचच रुग्णालयाचे डॉ. शिवराज पटारिया, नीता पटारिया या पती-पत्नीस अटक केली.