पुणे: राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा (किट्स) गैरवापर होत असल्याची शक्यता गृहीत धरून औषधांचे घाऊक; तसेच किरकोळ विक्रेत्यांसह गर्भपात करणाऱ्या रुग्णालयांची तपासणी मोहीम हाती घेतली होती.

गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या राज्यातील ४२ विक्रेत्यांना नोटिसा देऊन कारवाई करण्यात आली आहे, तर त्यातील १४ जणांवर गुन्हे दाखल करण्याचीही कारवाई करण्यात आली आहे. पुण्यात दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

३८४ संस्थांची तपासणी

Advertisement

राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ही कारवाई केली आहे. २६ जून ते नऊ जुलैदरम्यान ही मोहीम राबविण्यात आली. त्या मोहिमेंतर्गत राज्यातील ३८४ संस्थांची तपासणी करण्यात आली.गर्भपातासाठी लागणारी औषधे (एमटीपी किट्स) किरकोळ विक्रेते बेकायदेशीरपणे मिळवून, त्याची चढ्या दराने विक्री करीत असल्याची माहिती ‘एफडीए’च्या पथकाला मिळाली होती.

त्या अनुषंगाने ‘एफडीए’च्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून संबंधित किरकोळ विक्रेत्यांना बेकायदेशीरपणे मिळवलेले, चढ्या दराने; तसेच विना ‘प्रिस्क्रिप्शन’ने आणि बिलाशिवाय गर्भपाताची औषधे विक्री करताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून ४७ हजार ३७८ रुपयांची औषधे जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.

१३ किरकोळ विक्रेत्यांविरोधात कारवाई

Advertisement

राज्यात १३ किरकोळ विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यात आली. त्यात पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद या विभागांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत १४ गुन्ह्यांत ११ जणांना अटक करण्यात आली आहे. ज्या किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांच्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत, अशा ४२ विक्रेत्यांविरोधात ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे.