काम एकच. ठिकाणही एकच..वेळा वेगवेगळ्या…एकाच कामासाठी एका वेळी एक निकष..तर दुस-या वेळी वेगळा निकष..एका ठराविक ठेकेदारासाठी पुणे महापालिकेचा हा उपद्‌व्याप सुरू आहे.

गुंतागुंत वाढली

पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या ३८ कोटी रुपयांच्या तीन निविदा प्रक्रियेतील गुंतागुंत वाढत चालली आहे. याच कामांसाठी तीन वर्षांपूर्वी सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनच्या (सीव्हीसी) अटी-शर्तीनुसार निविदा प्रक्रिया राबविली होती.

आता मात्र तेच जलशुद्धीकरण केंद्र आणि कामही तेच; मात्र निविदेत ‘सीव्हीसी’च्या निकषांना फाटा देऊन जलसंपदा विभागाच्या निकषांचा आधार घेऊन निविदा प्रक्रिया राबविल्याचे उघडकीस आले आहे. नागपूर येथील एका ठेकेदार कंपनीला हे काम मिळावे, यासाठीच हा उद्योग करण्यात आल्याचे समजते.

Advertisement

सीव्हीसीच्या नियमांना फाटा

खडकवासला रॉ वॉटर पंपिग स्टेशन, वारजे आणि वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातील विविध कामांसाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा खात्याने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

या तीन कामांच्या सुमारे ३८ कोटी रुपयांच्या निविदा मर्जीतील ठेकेदाराला मिळाव्यात, यासाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांनी घोळ घातला. त्याचे पडसाद आज महापालिकेत उमटले.

दरम्यान, तीन वर्षांपूर्वी याच कामांच्या निविदा महापालिकेने काढल्या होत्या. त्या वेळी काढलेल्या निविदा या सीव्हीसीच्या निकषानुसार काढल्या होत्या; मात्र तेच काम आणि त्याच जलशुद्धीकरण केंद्रांच्या कामांसाठी आता काढलेल्या निविदेच्या अटी-शर्तींमध्ये सीव्हीसीच्या नियमांना फाटा देऊन जलसंपदा विभागाचे निकष वापरल्याचे समोर आले आहे.

Advertisement