file photo

पुणेः कोरोनाच्या दुस-या लाटेत मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला. आता तिस-या लाटेतही मुलांना धोका असल्याचे सांगितले जाते.

या पार्श्वभूमीवर आतापासून लसीकरणापासून वंचित असलेल्या मुलांच्या लसीकरणाचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे.

सीरम करणार लसीचे उत्पादन

मुलांसाठी ‘कोवोवॅक्स’ या कोरोना प्रतिबंधक लसीच्या पहिल्या बॅचचे उत्पादन सीरममध्ये सुरू झाले आहे. जुलै महिन्यापासून लसीची दोन ते 18 वयोगटातील मुलांवर चाचणी होणार आहे.

Advertisement

पुण्यातील दोन चाचणी केंद्रांसह देशभरातील 10 विविध केंद्रांवर दुस-या आणि तिस-या टप्प्यांतील चाचण्या होणार आहेत.

‘कोवोवॅक्स’ लसीची निर्मिती सीरममध्ये सुरू झाल्याची माहिती सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी दिली होती.

९२० मुलांवर चाचणी

ही लस 18 वर्षांच्या आतील लहान मुलांसाठी तयार करण्यात आली आहे. पुण्याची ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ आणि अमेरिकेच्या ‘नोवोव्हॅक्स’ या दोन्ही कंपन्यांच्या वतीने ‘कोवोवॅक्स’ विकसित करण्यात आली आहे.

Advertisement

सीरमकडून दुस-या आणि तिस-या टप्प्यातील चाचणी 18 वर्षांच्या आतील 920 मुलांवर करण्यात येत आहे. 920 पैकी निम्मी म्हणजे 460 मुले ही 12 ते 17 वयोगटातील असून, उरलेली 460 ही 2 ते 11 वयोगटातील आहेत.

आधी 12 ते 17 वयोगट आणि नंतर 2 ते 11 वयोगटातील बालकांवर ही चाचणी करण्यात येईल. औषध महानियंत्रक कार्यालयाकडून (डीसीजीआय) परवानगी घेतल्यानंतर या ठिकाणी चाचण्या सुरू करण्यात येतील, अशी माहिती सीरमच्या वतीने देण्यात आली आहे.

केईएम आणि भारती हाॅस्पिटलमध्ये चाचण्या

या चाचण्या पुण्यातील भारती हॉस्पिटल आणि वढू येथील केईएम हॉस्पिटल या दोन ठिकाणी होणार आहेत, तर मुंबईतील नायर हॉस्पिटल, नागपूर शासकीय रुग्णालय आणि वर्ध्यातील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट येथे होणार आहेत.

Advertisement

उरलेली तीन केंद्रे देशातील तीन ठिकाणी आहेत. या ठिकाणी चाचण्या झाल्यानंतर ही लस डिसेंबरअखेर मुलांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.