पुण्यात कोरोनाचा पाॅझिटिव्हीटी दर कमी करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे.

एकीकडे चाचण्याचं प्रमाण वाढविलं जात असताना कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे, हे दिलासादायक आहे.

पॉझिटिव्हीटी रेट ४.१६ टक्के

गेल्या दीड महिन्याच्या तुलनेत सरत्या आठवड्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले, तर रुग्णसंख्या घटल्याचे दिसून आले.

११ ते १८ जुलै या कालावधीत शहरात ४४ हजार६९५ चाचण्या झाल्या. त्यापैकी १८६१ रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याचे निदान झाले. आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट ४.१६ टक्के इतका नोंदवला गेला आहे.

पॉझिटिव्हिटी रेट पुन्हा ५ टक्क्यांपुढे जाऊ नये, यासाठी प्रशासन आणि नागरिक अशा एकत्रित प्रयत्नांची गरज अधोरेखित होत आहे.

सरासरी रुग्णसंख्या कायम

सरत्या आठवड्यात दीड महिन्यातील सर्वाधिक चाचण्या झाल्या आहेत. आठवड्याची रुग्णसंख्या कमी दिसत असली, तरी दररोजची रुग्णसंख्या अजूनही २५०-३५० पेक्षा खाली आलेली नाही.

सरत्या आठवड्यात सर्वाधिक रुग्णसंख्या रविवारी, १८ जुलै रोजी ३६४ इतकी नोंदवली गेली, तर १२ जुलै रोजी सर्वांत कमी १८९ इतकी नोंदवण्यात आली आहे.

कोरोनमुक्तांची संख्या जास्त

दररोजच्या रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्याही यंदाच्या आठवड्यात जास्त आहे. आठवड्यात १८६१ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले, तर २१४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

शहरातील दररोजच्या मृत्यूची संख्याही दररोज ५ ते ७ इतकी नोंदवली जात आहे. मृतांची संख्याही आटोक्यात येणे गरजेचे असल्याचे मत वैद्यक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.