Pune News : जुन्नर तालुक्यात(Junnar) मागील वीस दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. लोकसंख्येची जास्त घनता असलेली तालुक्यातील नारायणगाव व वारूळवाडी ही दोन गावे कोरोना हॉटस्पॉट ठरली आहेत. तालुक्यात १२३९ ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यापैकी किरकोळ स्वरूपाची लक्षणे असलेले १०२० रुग्ण गृहविलगीकरण राहून उपचार घेत आहेत(Corona cases).

जुन्नर तालुक्यात मागील चोवीस तासात २१५ रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आढळून आले. त्यापैकी सर्वाधिक नारायणगाव शहरात ३८ रुग्ण, आळे येथे २९, ओतूरला १५, वारुळवाडीत १२ रुग्ण आढळून आले. नारायणगावात १६०; तर वारुळवाडीत साठ रुग्ण होम क्वारंनटाईन केले आहेत. होम क्वारंनटाईन रुग्णांचे तापमान, ऑक्सिजन आदींची तपासणी करण्यासाठी व आरोग्याचा आढावा घेण्यासाठी तालुक्यात तीनशे आशा वर्कर, मदतनीस, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.

Advertisement

रोज रूग्ण संख्या वाढत आहे. मात्र, रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी असून, डॉक्टरांच्या सल्ल्याने गृहविलगीकरण राहून घरीच उपचार करून रुग्ण कोरोनावर मात करत आहेत. बहुतेक रुग्णांचे लसीचे दोन डोस झाले आहेत. त्यामुळे त्यांना सौम्य लक्षणे आहेत आणि त्रास सुद्धा जास्त जाणवत नाही असे तपासणीअंती आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आरटीपीसीआर व रॅपिड ॲंटिजेन तपासणी सुविधा सुरू आहे. रुग्ण संख्येत रोज वाढ होत आहे. बहुसंख्य रुग्णांमध्ये किरकोळ स्वरूपाची लक्षणे आहेत. नागरिकांनी सार्वजनिक कार्यक्रम, गर्दीची ठिकाणे टाळणे आवश्यक असून, प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. आजारी पडल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
– डॉ. वर्षा गुंजाळ, वैद्यकीय अधिकारी

प्रशासनाने सोमवारपासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले असलेतरी नारायणगाव व वारूळवाडी ग्रामपंचायत हद्दीत कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे मुलांच्या सुरक्षेततेसाठी किमान पुढील पंधरा दिवस या भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू करू नये, अशी मागणी पंचायत समितीकडे केली आहे.
– योगेश पाटे, सरपंच, नारायणगाव

Advertisement