Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

भारतात आढळलेले कोरोनाचे स्वरूप चिंताजनक !

जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओनंतर आता अमेरिकेने भारतात सर्वप्रथम आढळलेले कोरोनाचे अधिक संसर्गजन्य ‘डेल्टा’ स्वरूप चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.

महिनाभरात हे स्वरूप अमेरिकेत मोठ्या प्रमाणात थैमान घालू शकते, असा इशारादेखील एका वृत्तातून देण्यात आला आहे. अमेरिकेच्या रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्र अर्थात सीडीसीने अमेरिकेत समोर येत असलेल्या विषाणूच्या अल्फा, बीटा, गामा, एप्सिलन आणि डेल्टा या स्वरूपांना ‘चिंताजनक’ श्रेणीत टाकले आहे.

सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेल्या अमेरिकेत आतापर्यंत जास्त प्रभाव असलेले कोणतेही स्वरूप सापडले नाही; पण भारतात आढळलेले डेल्टा स्वरूप चिंतेचा विषय ठरण्याची भीती वैज्ञानिकांकडून व्यक्त केली जात आहे. या स्वरूपाविरोधात तपास, उपचार आणि लस कमकुवत ठरेल, असे मानले जात आहे.

यापूर्वी सीडीसीने डेल्टा स्वरूपाबाबात अधिक सखोल संशोधन करण्याची गरज व्यक्त केली होती. डब्ल्यूएचओने १० मे रोजी या स्वरूपात चिंताजनक म्हणून घोषित केले होते. सीडीसीनुसार ५ जूनपर्यंत अमेरिकेत आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांमध्ये ९.९ टक्के रुग्ण हे डेल्टा स्वरूपाने बाधित होते.

विषाणूच्या वेगवेगळ्या स्वरूपांवर लक्ष ठेवणाऱ्या ‘आऊटब्रेक डॉट इन्फो’ या संकेतस्थळानुसार १३ जूनपर्यंत हा आकडा १०.३ टक्के इतका झाला आहे. प्रतिष्ठित प्रसारमाध्यम सीएनएनच्या एका अहवालातून महिनाभरात डेल्टा स्वरूप अमेरिकेत थैमान घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a comment