हवेली तालुक्यातील लोणी काळभोरमधील स्मशानभूमीत एखाद्या महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर सोने शोधण्यासाठी मृतदेहाची राख व अस्थी मध्यरात्री पळवून नेण्याच्या घटना घडत आहेत. यासंदर्भात लोणी काळभोर व कदमवाक वस्ती ग्रामपंचायतींनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

लोणी काळभोर ग्रामपंचायतींच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गाशेजारी ही स्मशानभूमी आहे. या ठिकाणी लोणी काळभोर व कदमवाक वस्ती या दोन्ही ग्रामपंचायतींच्या हद्दीत मरण पावलेल्या नागरिकांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात.

गेल्या काही महिन्यांपासून महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर रात्री या मृतदेहाची राख व अस्थी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. हिंदू धर्मानुसार मृत्यू झालेल्या दिवशी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात, दुसऱ्या दिवशी सकाळी या मृतदेहाची राख शेजारील ओढ्यात सोडली जाते.

या विधीला ‘सावडणे’ असे म्हणतात. अस्थी एका मातीच्या मडक्यात गोळा करून त्यांचे एखाद्या धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या ठिकाणच्या नदीतील पाण्यात विसर्जन केले जाते. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. अंत्यसंस्कार ते सावडणे, यादरम्यान एक रात्र नक्की असते.

रात्री अंत्यसंस्कार केलेला मृतदेह महिलेचा असल्यास राख व अस्थी चोरीला जात आहेत. सुरुवातीला चुकून झाले असेल म्हणून नागरिकांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले; परंतु आता हे प्रमाण वाढले आहे. स्थानिक नागरिकांच्या घरातील महिला मरण पावली असेल, तर हा प्रकार सहसा होत नाही;

परंतु जर बाहेरगावाहून येऊन येथे राहणाऱ्या कुटुंबातील महिला असेल तर नक्कीच हा प्रकार घडत आहे. यासंदर्भात लोणी काळभोर व कदमवाक वस्ती या दोन्ही ग्रामपंचायतींनी यासंदर्भात प्रतिबंधक उपाय योजून या घटना बंद कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

या ठिकाणी उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात हे प्रकार बंद होतील, असे लोणी काळभोरचे सरपंच राजाराम काळभोर यांनी सांगितले.