नगरसेवक लोकांच्या सेवेसाठी असतात. लोकांचे बळी घेण्यासाठी नाही. तेच शस्त्र बाळगायला लागले, सुपारी द्यायला लागले, की लोकांनी कुणाकडे पाहायचे, लोकांनी ज्यांचे अनुकरण करायचे, तेच वाममार्गाला लागले, की सर्वंच खुंटले. पूर्ववैमनस्यातून नगरसेवकानेच सुपारी देण्याचा प्रकार घडला.

बदला घेण्यासाठी सराईत गुन्हेगाराला सुपारी

गोळीबाराचा बदला घेण्यासाठी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या एका नगरसेवकानेच सराईत गुन्हेगारांना आरोपीच्या हत्येची सुपारी दिल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी आरोपींकडून तीन गावठी पिस्तुले, जिवंत काडतुसे व सव्वा लाखाची रक्कम जप्त केली. याप्रकरणी चौघांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अटक केलेल्यांची नावे

राजन जॉन राजमनी (वय 38, रा.भाग्योदय नगर, कोंढवा), इब्राहिम उर्फ हुसेन याकुब शेख (वय 27, रा काळा खडक, वाकड, पिंपरी-चिंचवड) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह बोर्ड सदस्य विवेक यादव व तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे रजेवर येरवडा कारागृहाबाहेर आलेला सराईत गुन्हेगार राजन जॉन राजमनी व त्याचा मित्र इब्राहीम शेख या दोघांनी कोणाच्या तरी खुनाची सुपारी घेतली असून त्यांच्याकडे शस्त्रे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

सापळा रचून अटक

राजन राजमनी हा दुचाकीवरुन लुल्लानगर परिसरात फिरत असल्याची खबर मिळताच पोलिसांनी सापळा रचून राजन व इब्राहीमला अटक केली. त्यांची अंगझडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे तीन गावठी पिस्तुल, जिवंत काडतुसे व सव्वा लाखाची रक्कम आढळली.

पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली, तेव्हा विवेक यादव याच्यावर चार वर्षांपूर्वी गणेश विसर्जन मिरवणुकीत गोळीबार करणाऱ्या बबलू गवळीला मारण्यासाठी यादवने सुपारी दिल्याची त्यांनी कबुली दिली.

राजनच्या मोबाईलची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये व्हीके व व्हीके न्यू हे मोबाईल क्रमांक आढळले. दोन्ही मोबाईलवरील संभाषण पोलिसांना संशयास्पद वाटले.